लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असताना त्याचा फटका होळीलाही बसणार आहे. यंदा चीनमधून भारतीय बाजारपेठेत येणारी उत्पादने कोरोनामुळे गत तीन महिन्यांपासून येणे बंद झाली आहेत; त्यामुळे ‘कोरोना’मुळे होळीच्या रंगावर संक्रात आली आहे. परंतू बुलडाण्यामध्ये सध्या मेड इन इंडीयाचाच माल विक्री होत असल्याचे दिसून येते.होळीचा उत्सव जवळ आला आहे. मेड इन चायनाचे उत्पादन बंद करण्यात आले असले तरी होळीचे साहित्य विकणाऱ्या भारतीय विक्रेत्यांसाठी कोरोना विषाणू लाभदायी ठरत आहे. बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची मागणी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी चायनाचे रंग व साहित्य यापेक्षा देशी रंगाची होळी असेल, अशी माहिती शहरातील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला दिली. दरवर्षी चीनमधून पिचकारी, ढोल, रंग, टोपी, पुंगी आदी साहित्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते; परंतु यावेळी कोरोनामुळे आयातीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांनी मुंबई, दिल्ली, सुरत या ठिकाणांहून ठोक उत्पादने विक्रीसाठी मागविली आहेत. भारतातील बहुतांश सणांमध्ये चीनहून येणाºया उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते; परंतु यंदा कोरोनामुळे या उत्पादनांना ब्रेक लागला असून, बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचीच संख्या जास्त आहे. कोरोनाचा परिणाम हा येणाºया सणांवरदेखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. अनेक वर्षांपासून सणासुदीला चिनी उत्पादनांची मागणी अधिक असल्यामुळे विक्रेते भारतीय उत्पादने कमी प्रमाणात विक्रीसाठी ठेवत असतात; परंतु आता परिस्थितीत बदल झाला आहे. असे असले तरी यंदा होळीच्या बाजारपेठेत मंदी राहणार असल्याचेही काही व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. १५ टक्क्यांनी वाढली महागाईचीनमधून येणारे साहित्य स्वस्त असल्याने सर्वसामान्य नागरिक चिनी साहित्य खरेदीला पसंती देतात. शिवाय, त्यामध्ये विविध पर्यायही चिमुकल्यांना आकर्षित करतात; परंतु यंदा कोरोनामुळे चीनमधून आयात ठप्प झाल्याने बाजारपेठही प्रभावित झाली आहे. त्यापुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा रंग व पिचकारी १५ टक्क्यांनी महाग झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
आपल्याकडे सध्या भारतीय माल आहे. चीनमधून येणारा माल आता बंद झाला आहे. त्यामुळे एकही साहित्य चीनमधील याठिकाणी मिळणार नाही.- अब्दूल समीर,रंग विके्रता, बुलडाणा.