खामगाव, दि. ६- ग्रामसेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेल्या कर्ज वसुलीसाठी बजावण्यात आलेल्या नोटिसची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर होळी केली. शेतकर्यांकडे ग्रामसेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेले कर्ज थकीत असून, या कर्ज वसुलीसाठी शेतकर्यांना नोटिस बजावण्यात येत आहेत. दरम्यान, सदर कर्ज वसुलीसाठी ग्रामसेवा संस्थेकडून सहायक निबंधक कार्यालयाकडे सर्टिफिकेट देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. या सर्टिफिकेट मागणीच्या अनुषंगाने सहायक निबंधक कार्यालयाने शेतकर्यांना महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम १९६0 च्या कलम १0१ नुसार सर्टिफिकेट का देण्यात येऊ नये, यासाठी म्हणणे मांडण्यासाठी शेतकर्यांना नोटिस पाठविल्या आहेत. या नोटिसमधून शेती हर्रासीच्या सूचना देण्यात येत आहेत. यावर्षी ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्यावेळी पावसाने दिलेला खो यामुळे शेती उत्पादनात घट आली आहे, तर सोयाबीनसोबतच इतर पिकांना भाववाढसुद्धा नाही. त्यातच जिल्हा बँक पीक कर्ज वसुलीसाठी नोटिस बजाविण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सोमवारी येथील सहायक निबंधक कार्यालय गाठून रोष व्यक्त केला. तसेच मिळालेल्या नोटिसची होळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनप्रसंगी शेतकर्यांची उपस्थिती होती.
कर्ज वसुलीच्या नोटिसची केली होळी
By admin | Published: February 07, 2017 2:57 AM