बुलडाणा : येत्या २८ मार्च राेजी असलेली हाेळी साध्या पद्धतीने व घरीच साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ पासून कोरोना बाधीत रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. येत्या २८ मार्च रोजी होळी व २९ मार्च रोजी रंगपंचमी उत्सव असून सदर उत्सव साजरे करताना सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होवून कोरोनाचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी होळी व रंगपंचमी उत्सव सामाजिक अंतर व अन्य आवश्यक उपाययोजनांचा अवलंब करून मोठ्या प्रमाणावर साजरे न करता, शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून, साध्या पद्धतीने घरीच साजरे करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन कायदामधील तरतुदींनुसार शिक्षेस पात्र राहणार असेही आदेशात म्हटले आहे.