- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : समाजात प्रेम, विश्वास आणि आदर ही त्रयीचा झपाट्याने ºहास होत असल्याने, घरगुती कलह वाढीस लागलेत. वाढत्या कलहांमुळे नात्यातील दरी वाढत आहे. समाज एकसंघ ठेवण्यासाठी तसेच नात्यातील ओलावा कायम ठेवण्यासाठी घरगुती कलह ‘संवादा’तूनच मिटवा, असा सल्ला राज्य महिला आयोग मुंबईचे वरिष्ठ समुपदेश लक्ष्मण मानकर यांनी केले. शेगाव तालुक्यातील जलंब येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला.
प्रश्न: महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोगाची भूमिका काय?
उत्तर: आधुनिक काळात राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात हिमतीने पुढे येणाºया महिलांसह अर्थाजनासाठी घराबाहेर पडणाºया महिलांना न्याय देण्यासाठी महिला आयोग अतिशय सकारात्मक पद्धतीने कार्यरत आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून महिला आयोगाने आजपर्यंत हजारो महिलांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
प्रश्न: अन्यायग्रस्त महिलांना मदत मिळवून देण्यासाठी आयोगाचे प्रयत्न तोकडे ठरताहेत का?
उत्तर: अजिबात नाही, महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठीच महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध कार्यशाळा आणि शिबिराच्या माध्यमातून महिलांचे समुपदेशन केले जाते. पोस्को आणि सरोगसी सारख्या महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथेही कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.
प्रश्न: वाढत्या घरगुती कलहामुळे समाज व्यवस्था धोक्यात आली आहे का?
उत्तर: निश्चितच, समाजातील प्रेम, विश्वास आणि आदर नाहीसा झाल्याचे विपरित परिणाम समाजव्यवस्थेवर जाणवत आहेत. संवाद नाहीसा झाल्यामुळं कुटुंब व्यवस्थाही धोक्यात आली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. समाजातील काही वाईट प्रवृत्तीमुळे स्त्री आणि पुरूष दोघेही बदनाम होत आहेत.
प्रश्न: व्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाजातील अडचणी वाढीस लागल्यात का?
उत्तर: निश्चित नाही, पूर्वीच्या काळी समसत्ताक पध्दती अस्तित्वात होती. महिलांच्या नावाने राज्यांची तसेच राजाची ओळख होती. मात्र, आजच्या आधुनिक काळात स्त्रीला कमी लेखल्या जात आहे. तिला कळसुत्री बाहुलं म्हणून पाहील जात असल्यामुळे समाजातील अडचणी वाढल्या आहेत. कोणतीही स्त्री दुखावल्या गेल्याशिवाय कुणाचेही अहीत करीत नाही, हा आपला दावा आहे.
प्रश्न: कौटुंबिक हिंसाचार कायद्यामुळे पुरूषांना वेठीस धरल्या जातेय का?
उत्तर: अजिबात नाही, भारतातील कायदे हे कोणत्याही स्त्री अथवा पुरूषां विरोधात नाहीत. तर समाजातील वाईट प्रवृत्ती विरोधात आहेत. वाईट प्रवृत्ती या स्त्री आणि पुरूषांमध्ये दोघांमध्येही असू शकतात. त्यामुळे पुरूषांना वेठीस धरण्याचा प्रश्न उद्भवतो तरी कोठे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
प्रश्न : कामाच्या ठिकाणी लैगिंक छळग्रस्त महिलांना आयोगाच्या आधाराची शाश्वती काय?
उत्तर : कामाच्या ठिकाणी होणाºया लैगिंक छळाविरूध्द प्रतिबंध, संरक्षण देण्यासाठी कायद्यानुसार सरकारी, निमसरकारी, आणि खासगी संस्था, मनोरंजनाची आणि खेळाची ठिकाणं, शैक्षणिक संकुल आदी ठिकाणी तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले. कायद्यानुसार महिलांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले यामध्ये महिला आयोगाची भूमिका निश्चितच महत्वाची आहे.
प्रश्न: समाजासाठी आपला संदेश काय?
उत्तर: दृष्टीकोन बदलत नाही, तोपर्यंत सुख नाही. समाधान हे मानावं लागतं. कोणत्याही वादाला शेवट आहे. त्यामुळे कोणताही वाद आधी संवादातून, नंतर चर्चा आणि समुपदेशनातून सोडवा. अपवादात्मक स्थितीतच न्यायालयाची पायरी चढा! हाच संदेश आपला ‘लोकमत’च्या माध्यमातून समाजाला राहील!