चिखली : कोरोना काळातील कडक लॉकडाऊनमध्ये आणि आताच्या गंभीर परिस्थितीतही जिवावर उदार होऊन गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील सर्व घरगुती गॅस एजन्सीत कार्यरत कर्मचारी प्रमाणिकपणे सेवा देत आहेत. अत्यंत विपरीत परिस्थिती असताना आणि जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असताना देखील घरोघरी गॅस पुरविणारे 'डिलिव्हरी मॅन' अद्यापही दुर्लक्षित आहेत. तथापि प्रतिबंधात्मक लसीकरणापासून वंचित आहेत.
कोरोना काळातील गतवेळच्या कडक लॉकडाऊनमध्ये आणि आता देखील जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सीत कार्यरत कर्मचारी व घरोघरी गॅस पोहचविणारे 'डिलिव्हरी मॅन' यांचा देखील कोरोना योध्दा म्हणून सन्मान होणे आवश्यक होते. मात्र, आजवर त्यांचा सन्मान तर दूरच साधी दखल कोणीही घेतलेली नाही, अशी खंत येथील इन्डेन गॅस एजन्सीचे संचालक शैलेश बाहेती यांनी व्यक्त केली. दरम्यान कोरोनाची सर्वत्र दहशत असताना देखील स्वत:च्या जीवाची पर्वा न करताना प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या कोरोना योध्दयांची देखील दखल घेण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीवर कार्यरत कर्मचारी व घरोघरी गॅस पोहचविणार कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देऊन त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी बाहेती यांनी केली आहे. यासंदर्भात चिखली तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना ८ एप्रिल रोजी निवेदन देखील देण्यात आले आहे.