बुलडाणा: कोरोना संसर्गाबाबत हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे १९ एप्रिल रोजी आढावा घेणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा येथील विश्रामगृहामध्ये जिल्हाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाºयांसमवेत ते चर्चा करणार आहे. दरम्यान, अकोला येथेही ते १९ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता पोहोचणार आहेत.औरंगाबाद येथून दुपारी ते बुलडाणा येथे येणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजता ते प्रत्यक्ष बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. जे. सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या समवेत प्रामुख्याने ही आढावा बैठक घेणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील २१ कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांपैकी तीन रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरू असून एका रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचाही ते आढावा घेतील. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातूनही एकंदरीत पाहणी करतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे.बुलडाणा येथील एकंदरीत स्थितीची पाहणी केल्यानंतर ते १९ एप्रिल रोजी अकोला येथे जाणार असून तेथील विश्रामगृहावर ते थांबणार आहेत.
कोरोना संसर्गाचा गृहमंत्री अनिल देशमुख घेणार रविवारी आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 4:48 PM