लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर अन्य कामकाजांत पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्ड बांधवांचे मानधन गत तीन महिन्यांपासून थकीत आहे. १ फेब्रुवारीपासून कामही बंद असल्याने होमगार्डसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे.
कोणतेही सण, उत्सव, निवडणुकांमध्ये पोलिसांच्या बरोबरीने होमगार्ड कर्तव्य बजावतो. तपासणी यंत्रणेचा भाग सोडला तर बंदोबस्तावर १२ तासांपेक्षा अधिक पहारा देणाऱ्या जिल्ह्यातील होमगार्ड बांधवांना मानधनही नियमित मिळणे अपेक्षित आहे. कोरोनाकाळात जिल्ह्यातील होमगार्ड्सना नियमित काम मिळाले. कोरोनाचा आलेख खाली आल्याने आणि सण, उत्सव, मिरवणुकीवर मर्यादा असल्याने होमगार्डस् फारसे काम उरले नाही. कोरोनाकाळात शासनाकडून होमगार्ड्सच्या कर्तव्याला नियमित मंजुरी दिली जात होती. आता केवळ सण, उत्सव व कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित झाला तरच होमगार्ड्सच्या सेवेला शासनाकडून मंजुरी मिळते. १ फेब्रुवारीपासून मंजुरी मिळालेली नाही. १९ फेब्रुवारीला शिवजयंती असून, या दरम्यान दोन, तीन दिवसांसाठी होमगार्ड्सच्या सेवेला मंजुरी मिळणार असून, त्यांना बंदोबस्तासाठी बोलाविण्यात येणार आहे. वर्षांतील काही दिवसच काम मिळत असल्यामुळे अनेकजण पार्टटाईम इतर व्यवसाय करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून येते. सण, उत्सव, निवडणुकीदरम्यान कर्तव्य बजावल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक होमगार्ड्सना अद्याप मानधन मिळाले नाही. होमगार्ड्सचे काम थांबल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढत आहे.
सण, उत्सवामध्ये नियुक्ती
सण, उत्सव असल्यास हाेमगार्ड यांची पाेलिसांबराेबर नियुक्ती करण्यात येते. काेराेना काळात हाेमगार्ड यांना नियमित ड्यूटी मिळाली हाेती. हाेमगार्ड यांना १० तास काम केल्यास प्रति दिवस ५७० रुपये मानधन देण्यात येते. तसेच दाेन तास अतिरिक्त काम केल्यास ६७० रुपये मानधन देण्यात येते. गत नाेव्हेंबर २०२० पासून जिल्ह्यातील १५३४ हाेमगार्ड यांचे मानधन रखडलेले आहे.
जिल्ह्यातील हाेमगार्डच्या रखडलेल्या वेतनाविषयी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडून अनुदान मिळताच हाेमगार्ड यांचे मानधन अदा करण्यात येणार आहे.
बजरंग बनसाेडे, जिल्हा समादेशक, बुलडाणा