बुलढाणा : आधी ऑडीओ कॉल करुन अश्लील संभाषण केले. ऐवढेच नव्हे तर व्हिडीओ कॉल करुन अश्लील हावभाव केले. आकर्षित झालेल्या व्यक्तीस नंतर भेटण्यास बोलावले. त्याचवेळी अंगावरील कपडे काढून अश्लील हावभाव केले. मात्र, याचवेळी तिथे पाच जण दाखल होऊन ‘पाच लाख रुपये दे नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करु, असे म्हणत साडेपाच हजार रुपये काढून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
याप्रकरणातील पाचही आरोपींना बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच असलेल्या व्यक्तीने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, आरोपी शारदा ज्ञानेश्वर गायकवाड या महिलेने आधी ऑडीओ कॉलवर करुन संभाषण केले. काही दिवसानंतर व्हिडीओ कॉल करुन कपडे काढून अश्लील हावभाव केले. याच दरम्यान ३ सप्टेंबर रोजी शहरातील सर्क्युलर रोडवरील डीएड कॉलेजवळ भेटण्यास बोलावले. तिथे तक्रारकर्ता व्यक्ती गेला असता आरोपी महिलेने महाविद्यालयाच्या कंपाउंडमध्ये असलेल्या टीनशेडच्या खोलीमध्ये घेऊन गेली. यावेळी महिलेने अंगावरील कपडे काढले. याचदरम्यान आरोपी कृष्णा भास्कर पवार(२४,रा.चिखली रोड),संतोष सखाराम जाधव (३५,रा.सागवन), अजय सुनिल विरसीत (२२,रा.जगदंबा नगर),रुपेश शंकर सोनोने (२२,शिवशंकर नगर,) हे तिथे आले आणि त्यांनी तक्रारदार व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढले आणि चित्रफित काढली. ‘आम्हाला पाच लाख रुपये दे नाही तर काढलेली चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी दिली. याचवेळी एकाने खिशात हात घालून साडेपाच हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरडाओरड केली म्हणून झाली सुटकाटीनशेडच्या खोलीमध्ये लुटल्याच्या घटनेनंतर पाचपैकी तीन आरोपींनी तक्रारदाराच्या दुचाकीवर तक्रारदार व्यक्तीस बसविले. ‘चल तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन जेलमध्ये पाठवतो’ म्हणून पोलीस स्टेशनकडे घेऊन जात असताना मोठी देवी मंदिराजवळ तक्रारादाने पोलिसांना बघून आरडाओरड केली. तेव्हा पोलिसांसमोर हा प्रकार आला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना तत्काळ अटक केली.
लुटल्या गेलेला व्यक्ती माजी सरपंचपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात लुटल्या गेलेला व्यक्ती हा तालुक्यातील एका गावाचा माजी सरपंच आहे. तेव्हा मोठ्या शहराप्रमाणेच आता बुलढाण्यातही हनी ट्रॅपचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असल्याचे चित्र आहे.
व्हिडीओ कॉल करुन अश्लील हावभाव करणे, नंतर भेटण्यास बोलावून लुटणे असे प्रकार सध्या घडत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशा महिला, व्यक्तींकडे आकर्षित होऊ नये. तेव्हाच अशा घटना टाळता येऊ शकतात.प्रल्हाद काटकर,पोलीस निरीक्षक, शहर.