- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. त्यांनी या महोत्सवात ‘वाटर कलर पेंटिंग्स ’ प्रदर्शित केल्या होत्या. कतारची राजधानी दोहा येथे ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान युनेस्को, इंटरनॅशनल अॅक्शन आर्ट, मिडल इस्ट आर्ट अँड सिल्क पेंटर्स असोसिएशन्स आणि कतार इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल तर्फे संयुक्तरित्या कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ५० हुन अधिक देशातील जागतिक कीर्तीच्या १४८ कलाकारांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय स्तराच्या सहा दिवसांच्या ह्या सोहळ्यात कलाकारांनी त्यांच्या वैशिष्ट्य पूर्ण शैलीच्या पेंटिंग्स प्रदर्शित केल्या होत्या. ह्या शिवाय लाईव्ह पेंटिंग्स प्रकारात आर्टिस्ट्स ना प्रत्यक्ष समसामायिक कलाकारांसोबत आपली कला सादर करण्याचा आणि इतरांकडून शिकण्याचा मौलिक अनुभवही यावेळी मिळाला. जो प्रत्येक कलाकारासाठी खूप शिकण्यासारखा असतो. या शिवाय कल्चरल टुर, मास्टर आर्ट क्लासेस, पेनल परिसंवाद, कॅटलॉग पब्लिकेशन, मीडिया कव्हरेज इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन होते. या कार्यक्रमास कतारच्या कला, संस्कृती आणि खेल मंत्री सलाह बिन गनीम अल-अली यांनी व्यक्तिगत रित्या सहभागी सर्व कलाकरांना शुभेच्छा देत खास शाही डिनर चे आयोजन केले होते. अरुणा ह्यांना पेंटिंग्सची आवड लहानपणा पासूनच होती. शाळा कॉलेज मध्ये असतांना कला विषयक स्पर्धांमध्ये त्या नेहमीच आवडीने भाग घेत. पुढे हौशी कलाकार म्हणून विविध माध्यमांचा वापर करत त्यांनी वॉटर कलर्स माध्यम ह्या त्यांच्या आवडीच्या माध्यमात स्वत:ला विकसित केले. आतापर्यंत त्यांनी कतार इथे वेगवेगळ्या कला गॅलरीत आपल्या पेंटिंग्स प्रदर्शित केलेल्या आहेत. त्यांचं हायस्कुल पर्यंतचे शिक्षण भुसावळ च्या अहिल्या देवी कन्या शाळेत तर ग्रॅजुएशन कोटेचा कॉलेज येथे झालेले आहे. पुढे त्यांनी फायनान्समध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. मागच्या १२ वर्षांपासून त्या कतार इथे युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका आहेत. नोकरी घर सांभाळून त्या आपला पेंटिंग्सचा छंद जोपासतात. या शिवाय त्या स्थानिक मीडिया मासिकात स्तंभ लेखन करतात. त्यांचे पती डॉ किशोर धाडे हे अपोलो हॉस्पिटल कतार इथे कार्यरत असून त्यांच्या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेत आहेत. आवडीने जपलेल्या आपल्या छोट्याशा छंदाचं रूपांतर इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सम्मानात होईल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या ह्या सम्मानाबद्दल त्यांची सर्वस्तरातून प्रशंसा होत आहे.
भारतीय राजदूतांनी केला गौरव कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात डॉ. प्रा. अरुणा धांडे यांनी ‘गोल्ड नून अँड सिल्वर नून’ म्हणजेच ‘सोन दुपार व चंदेरी दुपार’ ह्या दोन वॉटर कलर पेंटिंग्स प्रदर्शनाकरीता निवडल्या गेल्या होत्या. कतार चे भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्या हस्ते त्यांना युनेस्को आणि मिडल इस्ट आर्टिस्ट असोसिएशन संयुक्त विद्यमानाने ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले.