देशातील दुसरे रामसर स्थळ असलेल्या लोणार सरोवर विकासाला नेमकी कधी चालना मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे पाच फेब्रुवारी रोजी लोणारमध्ये येत आहे. त्यामुळे येथील आढावा बैठकीदरम्यान ते नेमकी सरोवर परिसर विकासाच्या दृष्टीने कोणती घोषणा करतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. नागपूर खंडपीठाने सरोवर विकासाच्या संदर्भाने दाखल याचिकेत येथील विकासासाठी प्राधिकरण स्थापन्यासंदर्भातील पर्याय तपासण्यास सांगितले आहे. त्या संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अभिप्राय ही मागविण्यात आला आहे. प्राधिकरण स्थापल्यास सरोवर विकासाच्या कामाला गती येईल. थेट मंत्रालयीन स्तरावरून त्याचा आढावा घेतला जाईल. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रसंगी हे प्राधिकरण कार्यरत राहील. त्यामुळे मुख्यमंत्री सरोवर विकासाच्या दृष्टीने येथे नेमकी काही घोषणा करतात का? याकडे सध्या लक्ष लागून राहिले आहे.
सराेवर संवर्धन समितीकडून घेणार आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे पाच फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सरोवर संवर्धन समितीकडून सरोवर विकास आराखडा संदर्भातील नेमकी स्थिती काय? यासह अन्य मुद्द्यावर आढावा घेणार आहेत. नागपूर खंडपीठात दाखल याचिकेच्या संदर्भाने अलिकडील काळात लोणार सरोवर संदर्भातील अनेक संवेदनशील मुद्द्यांवर यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.