लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात शासनाच्या ‘अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत सौर कृषी पंप बसविले असून, ते यावर यशस्वीरीत्या बागायती शेती करीत आहेत. या सौर कृषी पंपाद्वारे १२ तास शेतातील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री पाणी द्यावे लागत नाही. हा त्रासही सौर कृषी पंपामुळे कायमचा बंद झाला आहे.राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायु प्रदूषणात भर पडत असून, हवामानावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपत्ती ठरावीक प्रमाणातच उपलब्ध आहे. पर्यावरणास पोषक तसेच दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने अपारंपरिक उर्जा स्रोताचा विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहनात्मक धोरण वेळोवेळी जाहीर केले आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत, निरंतर स्वरूपाचा व महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी महावितरणची विद्युत वाहिनी अद्यापपर्यंत पोहचलेली नाही किंवा ज्या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा स्रोताद्वारे विद्युत पुरवठा करणे शक्य होत नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर क्षेत्रापर्यंत शेती आहे. अशा शेतकऱ्यांकरिता ही अटल सौर कृषी पंप योजना आहे. तालुक्यातील १८ शेतकऱ्यांच्या शेतात सद्यस्थितीत या सौर कृषी पंपाद्वारे बागायती शेती हे शेतकरी करीत आहेत. सौर कृषी पंपाच्या युनिटद्वारे दिवसा १२ तास हे कृषी पंप शेतात चालत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसभर आपल्या बागायती शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत आहे. महावितरणची लाइट असो वा नसो, मात्र शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसविल्यामुळे आता सौर कृषी पंपाद्वारे बागायती शेती करीत आहेत. महावितरण कंपनीकडून कृषी पंपांना होणारा विद्युत पुरवठा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वेळोवेळी खंडित केला जात होता. त्यामुळे बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून व वन्य प्राण्यांपासून बचाव करीत पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र, सौर कृषी पंप बसविल्यामुळे तालुक्यातील १८ शेतकऱ्यांचा हा त्रास आता कायमचाच बंद झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये फक्त पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून हे सौर कृषी पंप आपल्या शेतात बसविले आहेत. याकरिता ३ अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता १६ हजार २०० रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरणा करून हा सौर कृषी पंप, तर ५ अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता २७ हजार रुपयांचा भरणा, तर साडेसात अश्वशक्ती एस.पी. पंपाकरिता ३६ हजार रुपयांचा ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरुन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे सौर कृषी पंप बसविले आहेत. या शेतकऱ्यांची कृषी पंपाद्वारे सुरू आहे बागायती शेती!तालुक्यातील गजानन रामभाऊ वानखडे आकोली, ज्योती संदीप धामोळे सोनाळा, दिनेश नंदकुमार बंदरकर टुनकी, सुरेखा मंगेश भोंडे एकलारा, तुळशीराम मुकुंदा बंदरकार टुनकी, नारायण रतनलाल चांडक, वानखेड, अमोल अरुण वानखडे पळशी, गोपाल काशिनाथ गाडगे उमरा, श्रीकृष्णा तुळशिराम सारिशे पेसोडा, धुमसिंग वालसिंग टुडवा वसाडी, ज्योती अशोक टावरी काथरगाव, केसरबाई गंगाराम मसण्या करमोडा, मदनसिंग माली, हदयामहल, गयाबाई रामदास कोठे सोनाळा, आनंदा शंकर वानखडे हिंगणा, संदीप बाबनराव धामोळे, कुठरसिंग जाधव सालवण या अठरा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सौर कृषी पंप बसवून बागायती शेती केली आहे.शेतात कृषी पंप बसविल्यामुळे भारनियमनाचे आता टेन्शन नाही. तसेच १२ तास सौर कृषी पंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देता येत असल्यामुळे आता उत्पादनातही वाढ झाली आहे.- वैभव गजानन वानखडे, शेतकरी आकोली
सौर कृषी पंपावर बागायती शेती
By admin | Published: May 20, 2017 12:18 AM