लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी २० हजार रुपयांचे एक पॅकेज असून, याअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय व खासगी मिळून १२ रुग्णालयांनी गेल्या १४ महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांपैकी १.३२ टक्का अर्थात १,०१९ कोरोनाबाधितांवरच उपचार करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. एक प्रकारे ‘जनआरोग्य’चे रुग्णालयांना वावडे आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, फुप्फुसाच्या आजाराशी संबंधित जवळपास २० पॅकेजअंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार या योजनेंतर्गत करता येतात. सामान्य पॅकेज हे दहा दिवसांचे आहे. त्यानंतर रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लागल्यास एक दिवसाच्या अंतराने या पॅकेजचे नूतनीकरणही करता येते. यामध्ये महागड्या इंजेक्शनचा खर्च मात्र रुग्णांनाच करावा लागतो. कोरोनासंदर्भाने किडनी व तत्सम आजारासंदर्भातील पॅकेजही यामध्ये परवानगी घेऊन लागू करता येते, असे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी सांगितले.जिल्ह्यात आजपर्यंत ७७ हजार ४४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून, त्यापैकी शासकीय व खासगी मिळून १,०१९ जणांवरच उपचार करण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयामध्ये तर केवळ १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित सर्व १,००७ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. त्यावर २ कोटी ३ लाख ८० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे.
एकूण २० पॅकेज उपलब्धकोरोनाबाधित रुग्णांसाठी जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण २० पॅकेज उपलब्ध आहेत. प्रामुख्याने फुप्फुसाशी संबंधित (श्वसनाशी संबंधित) आजाराच्या पॅकेजचा यामध्ये समावेश आहे. दहा दिवसांनंतरही रुग्ण बरा न झाल्यास त्या पॅकेजचे नुतनीकरण एक दिवसाच्या अंतराने करण्याची सुविधा आहे.
३० जनआरोग्य मित्रांकडे करता येते नोंदणीयोजनेच्या लाभ देण्यासाठी जिल्ह्यात ३० जन आरोग्यमित्रांची मदत घेता येऊ शकते. प्रसंगी संबंधितांच्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र टाकल्यास योजनेमध्ये रुग्णाचा अंतर्भाव करण्यास हे आरोग्यमंत्री मदत करतात. दरम्यान, खासगी रुग्णालयांकडून काही अडचणी येत असल्यास योजनेचे जिल्हा समन्वयक आणि क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार किंवा संपर्क साधता येतो. जिल्हाधिकाऱ्यांकडेही ई-मेलद्वारे तक्रार करता येते.
सहाही रुग्णालयांना नोटीसकोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचाराचा लाभ न दिल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने सहा खासगी रुग्णालयांना नोटीस दिल्या आहेत. त्यासंदर्भात अद्याप संबंधित रुग्णालयांकडून त्याचे स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.