लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे अनेक व्यवसाय डबघाईस आले असून, हॉटेल व्यवसाय गत चार महिन्यांपासून ठप्प आहे. चहाची टपरीपासून तर आलिशान निवासी हॉटेल मालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात चहा टपरी, नास्ता व चहा विक्री करणारे, मोठे रेस्टारंट, निवासी व्यवस्था असलेले हॉटेल, बार व रेस्टारंटसह शेकडोंच्या संख्येत आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावर अनेक ढाबे आहेत. हा संपूर्ण व्यवसाय पूर्णता कोसळला आहे. जिल्ह्यात लोणार हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्याने येथे जगभरातून पर्यटक येतात. या पर्यटकांसाठी येथे अनेक हॉटेल सुरू करण्यात आले. तसेच शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. त्यामुळे शेगावमध्ये सुद्धा अनेक हॉटेल सुरू करण्यात आले. यासोबतच खामगाव, चिखली या शहरांमध्येही अनेक मोठे हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. व्यावसायिकांनी लाखोंचे कर्ज काढून हे हॉटेल सुरू केले आहेत. मात्र, गत चार महिन्यांपासून जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल व मे महिन्यात हॉटेल अत्यावश्यक सेवेत येत नसल्यामुळे पुर्णता बंद होते. जून व जुलै महिन्यात हॉटेल सुरू करण्यात आले असले तरी याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. कोरोनाचा धोका असल्यामुळे सध्या नागरिक बाहेर कोणताही पदार्थ खाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात हॉटेल सुरू करण्यात आले असले तरी ग्राहक मिळत नाहीत.हॉटेल व्यवसायामध्ये हजारोंच्या संख्येने कामगार काम करतात. खाद्य पदार्थ बनविणाºयांपासून तर वेटरपर्यंत अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. चार महिन्यांपासून कामगार बेरोजगार झाले आहेत. हॉटेल सुरूच नसल्यामुळे मालकांनी कामगारांना वेतन देणे बंद केले आहे. सध्या दुसरीकडे कुठेच काम मिळत नसल्याने या कामगारांसमोर कुटुंबाचे पालन- पोषण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाणीपूरी व्यवसायिकांवर उपासमारीची वेळजिल्ह्यात हजारो पाणीपूरी व्यावसायिक आहेत. या सर्वांवर कोरोनामुळे उपासमारीची पाळी आली आहे. मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल व मे महिना पाणीपूरीच्या गाड्या बंद होत्या. त्यानंतर पाणीपुरीची विक्री सुरू करण्यात आली. मात्र, सध्या नागरिक बाहेरील कोणतेही खाद्य पदार्थ खात नसल्यामुळे व्यवसाय ठप्प आहे.