बुलढाणा: मराठा आरक्षणासाठी किती दिवस मोर्चे काढायचे. तीन पिढ्या गेल्या. असा काय गाढा अभ्यास आहे, जो सरकार करत आहे, असा प्रश्न बुलढाण्यातील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भगीनी भारतीताई कटारे यांनी उपस्थित केला आहे.
बुलढाणा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेच्या कार्यालयात मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांची बहीण सुवर्णा शिंदे आणि भाची अर्थात मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी आणि राजर्षी शाहू परिवाराच्या मालती शेळके प्रामुख्याने उपस्थित होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्या आंदोलनामध्ये पूर्वीपासून सक्रीय आहेत.
यावेळी भारतीताई कटारे यांनी गोदा काठच्या (गोदावरी नदी काठच्या) १०३ गावांच्या प्रश्नासंदर्भाने प्रारंभी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. दरम्यान आंदोलन हे कुणबी प्रमाणपत्रासाठी नाही तर आरक्षण सरसगट हवे यासाठी आहे. आपले भाऊ सगळ्यांच्या न्यायासाठी उपोषणास बसले आहेत, असे त्या म्हणाल्या. उद्या जर काही कमीजास्त झाले तर त्यास सरकार जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तरुणांनी वेगळे पाऊल उचलू नयेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज भैय्या उपोषणास बसले आहे. तुमच्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील तरुणांनी वेगळे पाऊल उचलून आत्मघात करून घेऊ नये. आरक्षण मिळाल्यानंतर तुम्ही त्याचे लाभ घेतांना मनोज जरांगे पाटील यांना तुम्हाला बघायचे आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी तथा अन्य व्यक्तींनी आत्मघात करणारे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहनही भारतीताई कटारे यांनी यावेळी केले.