लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मला कर्ज माफी मिळाली, असे फलक घेऊन आंदोलन करणाऱ्यांपैकी किती जणांच्या नावावर शेतीचा सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांना कर्ज माफी मिळाली आहे, असा सवाल आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे उपस्थित केला असून, जिल्हा भाजपाने कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याची तारीख जाहीर करावी, असेही आवाहन केले आहे. माझी कर्ज माफी झाली नाही, या विषयावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने बुलडाण्यापासून राज्यस्तरीय ‘एल्गार’ पुकारला. कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्यातून या आंदोलनाचा बिगूल वाजला. त्यावेळी या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या प्रदेश अध्यक्षांच्या वाहन ताफ्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मला कर्जमाफी मिळाली, असे फलक दर्शवित घोषणाबाजी केली होती.दरम्यान, गुरुवारला आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्टिटरद्वारे भाजप आंदोलनातल्या बोर्ड हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांपैकी कितींच्या नावावर सात-बारा आहे व त्यापैकी किती जणांची कर्जमाफी झाली आहे, नावे जाहीर करावे, असे व्टिट केले आहे. सोबतच दुसऱ्या एका व्टिटमध्ये मला कर्जमाफी मिळाली, असे फलक मिरवणाऱ्या बुलडाणा जिल्हा भाजपने कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांचा त्वरित मेळावा आयोजित करून मेळाव्याची तारीख जाहीर करण्याचे आवाहनसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. पोलीस कारवाईस सामोरे जाण्यास तयार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याबाबत बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गुन्हे दाखल झाल्याचे कळल्यानंतर नियोजित दौऱ्यानुसार, प्रदेश अध्यक्षांसोबत शेगाव येथे न जाता स्वत:ला अटक करून घेण्याकरिता आपण थेट बुलडाणा पोलीस स्टेशन गाठले होते. आपल्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून, दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने मला अटक करावी, अशी मागणी केली होती. तथापि पोलीस प्रशासनाने चौकशी, पुरावे व गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता अटक करण्यास असमर्थता दर्शविली. आरोपांबद्दल विचारले असता, सार्वजनिक जीवनात काम करताना आया-बहिणी, लेकी-बाळी जर असे गंभीर आरोप करीत असतील तर हा विषय बोलण्यापलीकडचा असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच फिर्यादींनी व्यक्तीश: केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने पुरावे पोलिसांना सादर करावे. त्या अधारावर आपल्यावर होणाऱ्या पोलीस कार्यवाहीस आपण तयार असल्याचेसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शांतता व सलोखा कायम रहावा, ही भारतीय संविधानाचा एक पाईक व भारतीय नागरिक म्हणून आपली नेहमी भूमिका असते. जयस्तंभ चौकात एकीकडे हजारोच्यावर काँग्रेस कार्यकर्ते व दुसरीकडे भाजपाचे मोजके निदर्शनकर्ते तसेच अत्यल्प पोलीस बळ लक्षात घेता उद्भवणारी संभाव्य परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, त्याकरिताच आपण तिथे थांबून कार्यकर्त्यांना शांततेने कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, ही भूमिका पार पाडल्याचे सर्वश्रुत आहे, असे सुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
आंदोलनकर्त्यांपैकी किती लोक सातबाराधारक?
By admin | Published: July 14, 2017 12:45 AM