बुलढाणा : मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. त्यामुळे मृतकांची नावे जरी कळाली असली तरी कुणाचा मृतदेह कोणता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी डीएनए चाचणीच्या पर्यायांसह प्रसंगी मृतकांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याच्या शक्यतेची प्रशासनाने चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार मृतकांच्या नातेवाइकांचे समुपदेशनही करण्यात येत आहे.
१८ मृतकांचे नातेवाईक बुलढाण्यात दाखल झाले आहेत. या सर्वांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वनस्टॉप सेंटरमधील सभागृहात समुपदेशन करण्यात येत आहे. दुसरीकडे डीएनए चाचणीसाठी पुणे येथील सहा जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले असून प्रारंभी या पथकाने सिंदखेड राजातील पिंपळखुटा येथील घटनास्थळाचे नमुने घेतले आहेत.
सिंदखेड राजाचा ‘ताे’ परीघ अपघाताचे केंद्र?
समृद्धी महामार्गाचे एकूण अंतर ७१० किमी आहे. यात मुंबई ते सिंदखेड राजा आणि नागपूर ते सिंदखेड राजा हे अंतर जवळपास समान आहे. नागपूर किंवा मुंबईहून रात्री उशिरा निघालेली वाहने सिंदखेड राजा परिसरात पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली असते. साखरझोपेच्या या वेळेत सिंदखेड राजा ते मेहकर परिसरातील ७० ते ८० किमी परिघात मानवी चुकांमुळे अधिक अपघात झाले असून, यात अनेकांना जीव गमवावा लागल्याचे निरीक्षण अनेकांनी नोंदवले आहे.
समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेल्या अपघातांतील मृत्यूचा आकडा शंभराहून अधिक झाला आहे. सिंदखेड राजा हे मुंबई आणि नागपूर या दोन्ही मुख्य शहरांच्या प्रवासादरम्यानच्या अंतराचे जसे मध्यवर्ती केंद्र आहे, तसेच ते आता अपघाताचेदेखील केंद्र ठरत असल्याने चिंता वाढली आहे. महामार्ग व्यवस्थापनाने अद्यापही या संपूर्ण प्रवासादरम्यान उपाहारगृहे, विश्रांती केंद्रे मुबलक प्रमाणात बनवलेली नाहीत. त्यामुळे सलग प्रवास करून वाहन चालक थकून जातात.