खामगाव - प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेतंर्गत खामगाव शहरातील नगर पालिका आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये गत पाच दिवसांपासून तांदळाचा पुरवठाच नाही. तांदूळ उपलब्ध नसल्याने नगर पालिकेतील ३२५० आणि खासगी शाळेतील ५२०० विद्यार्थ्यांना खिचडीविणाच रहावे लागत असल्याचे चित्र आहे.
शालेय पोषण आहार मधान्य भोजन योजनेतंर्गत (प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजनेतंर्गत) इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मधान्य भोजनात खिचडीचे वितरण करण्यात येते. खामगाव येथील नगर पालिकेच्या १४ शाळेतील ३२५० तर खासगी अनुदानीत १४ शाळांमधील ५२०० आणि जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमधील विद्यार्थी या योजनेतंर्गत पात्र आहेत. दरम्यान, गत पाच दिवसांपासून या विद्यार्थ्यांसाठी तांदूळच उपलब्ध नाही. त्यामुळे शहरी भागातील तब्बल ३० शाळांमध्ये खिचडीच शिजली नाही. तांदळाचा साठा संपल्याने तांदळाशिवाय खिचडी कशी शिजवायची रे भावा?, असा प्रश्न संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना पडला आहे.
किराणा मालाचे वाटपपुरवठादारामार्पत गत पाच दिवसांपासून तांदूळ अप्राप्त आहेत. मात्र, त्याचवेळी इतर धान्यादि तसेच किराणा मालाचा पुरवठा बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. इतर साहित्य असलेतरी खिचडीतील मुख्य घटक तांदूळच नसल्याने शहरी भागातील साडेआठ हजार विद्यार्थी खिचडीविना असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात हीच परिस्थिती कायम
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती कायम असल्याचे समजते. त्यामुळे गत आठवड्यापासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खिचडी उपलब्ध होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
खिचडी शिजविण्यासाठी तांदळाचा साठा पाच दिवसांपूर्वीच संपला आहे. मागणीकरून ही पुरवठादाराकडून तांदूळ उपलब्ध केले गेले नाहीत. इतर धान्यादी माल म्हणजेच किराणा मालाचा बुधवारपासून पुरवठा करण्यात येत आहे. तांदूळ प्राप्त होताच खिचडी शिजविणे पूर्ववत केले जाईल - आनंद देवकते, प्रशासन अधिकारी, (शिक्षण)नगर परिषद खामगाव