लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मानव विकास कार्यक्रम अंतर्गत पहिली ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस सुविधा दिली जाते. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी शाळा सुरू झाल्या आहेत. परंतू अद्याप मानव विकासची एकही बस सुरू करण्यात आलेली नाही. मुलींचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले असून, ग्रामीण भागातील मुली शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत. या मुलींच्या प्रवासासाठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ४९ बसेस आहेत. परंतू त्यापैकी एकही बस सुरू करण्यात आली नाही. सध्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. पहिल्याच दिवशी अत्यल्प हजेरी दिसून आली. संख्येअभावी मुलींसाठी बसेस सुरू करणे सध्या परवडणारे नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात मानव विकासच्या तीन आगारामध्ये एकूण ४९ बसेस आहेत. अद्याप मुलींसाठी बसेस सुरू केल्या नाहीत. संख्या वाढल्यानंतर बसेस सोडण्यात येतील.-ए. यू. कच्छवे, वाहतूक नियंत्रक, बुलडाणा.