जळगाव जामोद: तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वडपाणी या भागात शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वडाच्या झाडाला महाराष्ट्र शासनाकडून वारसा वृक्षाचा दर्जा मिळाला असून गुरुवारी वटपौर्णिमेच्या पर्वावर मान्यवर महिलांच्या हस्ते या वृक्षाचे पूजन करण्यात आले. भविष्यात या वारसा वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी तरुणाई फाउंडेशनने स्वीकारली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, सामाजिक वनीकरण अधिकारी स्मिता राजहंस,तरुणाई फाउंडेशनचे उमाकांत कांडेकर, मानद वन्यजीव रक्षक सदस्य मनजीतसिंग,लोकमत सखी मंचच्या वंदना कांडलकर,माजी सरपंच विजया पाटील, माजी नगर सेविका लताताई तायडे , सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, डॉ.नंदूभाऊ तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिलांच्या हस्ते या वारसा वटवृक्षाचे पूजन करण्यात आले.सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या वारसा वृक्षाच्या फलकाचे अनावरण उपविभागीय महसूल अधिकारी यांनी केले.या वटवृक्षाची गोलाई 25 मीटर असून या वटवृक्षाला भविष्यात कोणीही तोडणार नाही याची दखल सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने घेतली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने शंभर वर्षे व त्यापेक्षा जुन्या वृक्षाचे जतन करून त्यांना वारसा वृक्षाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने सामाजिक वनीकरण अधिकारी स्मिता राजहंस यांनी तालुक्यातील वडपाणी येथील या वृक्षाचे नाव शासन दरबारी पाठविले आणि त्या वटवृक्षाला वटपौर्णिमेच्या पर्वावर वारसा वृक्षाचा दर्जा देण्यात आला. या वारसा वृक्षाचे जतन करण्याची जबाबदारी तरुणाई फाउंडेशनने स्वीकारली आहे. या प्रसंगी माजी सरपंच पुंडलिक पाटील, लता उमरकर, डी.एस. देशमुख, अमोल धवसे यांची उपस्थिती होती.
शंभर वर्षे जुन्या वडाच्या झाडाला मिळाला वारसा वृक्षाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 8:24 PM