- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता व पाणीटंचाई लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा रेटा शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींकडून लावून धरला जात आहे. परंतू शिक्षण विभाग सकाळच्या सत्रासाठी २० मार्चच्या निर्णयावरच ठाम आहे. त्यामुळे जिल्हा परिषदच्या दीड हजार शाळेतील विद्यार्थ्यांना आणखी २० दिवस उकाडा सोसावा लागणार आहे. जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तसेच दिवसेंदिवस तापमानातही वाढ होत आहे. विद्यार्थी वाढत्या तापमानामुळे त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील १ हजार ४४२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपैकी जवळपास ७५ टक्के प्राथमिक शाळा ह्या टिनाच्या खोलीत भरतात. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. वर्ग खोल्या सुद्धा हवेदार नाहीत. अनेक ठिकाणी वीज व पंख्याची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उकाड्यात बसणे असह्य होत असल्याची ओरड शिक्षण संघटनांकडून होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने मुलांना घरून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता व पाणीटंचाई या बाबींचा विचार करून सकाळच्या सत्रातील शाळा १ मार्चपासून सुरू करण्याचे पत्र शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद शिक्षण विभागकडे गेल्या आठवड्यात दिले. परंतू जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यासाठी २० मार्चचा मुहूर्त शिक्षण विभाग घेऊन बसला आहे. परिणामी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अजून २० दिवस तरी उन्हाळ्याचा हा त्रास सोसावा लागणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे शिक्षक संघटनांसह शिक्षकवर्गही यावर नाराजी व्यक्त करत आहे.
परिपाठात मुलांना चक्कर येण्याची भीतीजिल्हा परिषद शाळेचा परिपाठ सकाळी ११ ते ११.३० वाजता घेण्यात येतो. परिपाठाच्यावेळी रखरखत्या उन्हात मुलांना बाहरे उभे राहावे लागते. त्यामुळे लहान मुलांना चक्कर येण्याची भीती वाटते, ग्रामीण भागातील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याकडे लक्ष देण्याची गरज आदर्श शिक्षक समितीच्या (महिला आघाडी) जिल्हाध्यक्ष ममता ठाकुर यांनी व्यक्त केली.
खासदारांच्या पत्राला उलटले चार दिवससर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी मागणी लावून धरली आहे. तर २५ फेब्रुवारीला खासदार प्रतापराव जाधव यांनीही १ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकाºयांना द्यावे, असे पत्र जिल्हाधिकाºयांना दिले होते. मात्र चार दिवस उलटुनही यावर कुठलाच निर्णय झाला नाही.
शिक्षण विभागाच्या नियमानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २० मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. अद्याप कुठल्याच शाळेत पाणीटंचाई जाणवली नाही, तसे झाल्यास ग्रामपंचायत स्तरावरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्या जाते. - एस. टी. वºहाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
जिल्ह्यात पाणीटंचाई असून उन्हाची तिव्रताही वाढत आहे. अनेक शाळा टिनाच्या खोलीत भरत असल्याने मुलांना त्रास सोसावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविणे अत्यंत आवश्यक आहे. - रविंद्र अंभोरे, जिल्हाध्यक्ष, राज्य आदर्श शिक्षक समिती, बुलडाणा.