लोकमत न्यूज नेटवर्कभादोला(जि.बुलडाणा) : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा माता यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांची उपस्थिती होती. येथे जगदंबा माता यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने पाच दिवस साजरा केला जातो. दिवाळीपेक्षाही या उत्सवाला गावात अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे बाहेरगावी कामानिमित्त, नोकरीनिमित्त असलेले सर्व जण या उत्सवाला गावी येतात. गावातील मुलीदेखील या उत्सवासाठी सासरवरून माहेरी परततात. रंगपंचमीपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २ मार्चला सकाळी १० ते १ वाजेपर्यंत गावात रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. २ ते ६ मार्च दरम्यान विविध कार्यक्रम पार पडले. मंगळवार, ६ मार्च रोजी मंदिरावर महाप्रसाद वितरण करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी देवीला शेंदूर चढविण्यात आला, तर रात्री गावातून दफड्यांच्या निनादात देवीचे ताट काढण्यात आले. या उत्सवाचा प्रमुख सोहळा असलेली देवीची शोभायात्रा ७ मार्च रोजी निघाली. सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही शोभायात्रा दुपारी ४ वाजता संपली. विनोद अंबादास ठेंग यांना यावर्षीचा देवीचा मान मिळाला होता. सदर शोभायात्रेत सहभागी होण्यासह दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शोभायात्रेच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आली होती.
जगदंबा माता यात्रा महोत्सवाची सांगता, भादोला येथे शेकडो वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:14 AM
भादोला(जि.बुलडाणा) : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा माता यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांची उपस्थिती होती.
ठळक मुद्दे हजारो भाविकांची उपस्थिती