लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, याप्रमुख मागणीसाठी नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सोमवारी सुरूवात झाली. परवानगी नाकारण्यात आल्यानंतर भर उन्हात काका रुपारेल यांच्या नेतृत्वात पालिका प्रशासनाविरोधात उपोषण केले जात आहे.
खामगाव शहरातील पाणी पुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू असतानाच, पालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नाही. नागरिकांना तब्बल २०-२२ दिवस पाणी पुरवठा होत नाही. परिणामी विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरोधात रोष तीव्र होत असतानाच शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी काका रुपारेल यांनी सोमवारी पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली. या उपोषणाला विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. शरद वसतकर, नंदू भट्टड, बाबा काळे यांच्यासह नगरसेवक संदीप वर्मा, भिकूलाल जैन यांच्यासह अनेकांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे.
दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा!
उन्हाळ्यात शहराच्या विविध भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने काका रुपारेल मित्र मंडळाच्यावतीने दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी दोन टँकरही काका रूपारेल मित्र मंडळाच्यावतीने सोमवारी कार्यान्वित करण्यात आले. परवानगी नाकारण्यात आल्याचा निषेध म्हणून उन्हात बसून या उपोषणाला सुरूवात झाली.