लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १ आॅक्टोबरच्या दुपारी तालुक्यातील येवता शिवारात घडली. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेले नवदाम्पत्य सोनेवाडी येथील असून तरूण दाम्पत्याचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.तालुक्यातील सोनेवाडी येथील शांताराम देवराम राखुंडे (वय २३) व त्यांची पत्नी अर्चना ऊर्फ आरती शांताराम राखुंडे हे दाम्पत्य १ आॅक्टोबर रोजी येवता शिवारातील एका शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेले होते. सोयाबीन सोंगणीसाठी १२ जणांचा समुहात ते भल्या पहाटेपासून सोयाबीनची सोंगणी करीत होते. दुपारी जेवणानंतर शेताजवळील एका विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणावयास हे दाम्पत्य गेले होते. विहिरीतून पाणी काढताना अर्चना ऊर्फ आरती यांचा पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी शांताराम यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गावकरी व पोलिसांनी धाव घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले.मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या या नवदाम्पत्याचा लॉकडाऊन काळात साध्या पध्दतीने विवाह झाला होता. या प्रकरणी चिखली पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसआय बालुसिंग राजपूत, पोलीस काँस्टेबल उमेश राजपूत करीत आहेत.
विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचविताना पतीचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:39 PM