दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी अविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांच्यापैकी भारत बाबुराव बोबडे व त्यांची पत्नी सुशीला बोबडे यांची अविरोध अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड केली. एखाद्या ग्रामपंचायतमध्ये पती-पत्नी सरपंच-उपसरपंच असल्याचा हा एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल.
निवडणूक म्हटली की अवाजवी खर्च, गावातील नागरिकांना सांभाळणे, आपल्या गटातील माणसांची प्रसंगी समजूत घालून त्यांना आपल्या गोटातच ठेवणे यासोबतच गावपातळीवर गटातटाचे राजकारण होते. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक ही अनेकांसाठी शारीरिक, मानसिक तथा आर्थिकस्तरावर कष्टदायी असते. यातून बऱ्याचदा कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. मात्र लावणा गावातील नागरिकांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांना अविरोध निवडून दिले. यामध्ये भारत बाबुराव बोबडे, सुशीला भारत बोबडे, रामभाऊ हरिभाऊ गायकवाड, सुभाष निंबाजी वानखडे, कमल शेखर गवळी, संगीता पांडुरंग वानखेडे, पूजा काशिनाथ बोडखे यांचा समावेश होता. निवडणूक अविरोध झाल्यास गावापातळीवर विकासासाठी शासनस्तरावर निधी उपलब्ध होईल व गावाचे रुपडे पालटेल या दृष्टीनेही ग्रामस्थ प्रयत्नशील होते.
दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी लावणा गावासाठी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी पीठासीन अधिकारी जी. के. धोके, आले व त्यांनी नियानुसार निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास प्रारंभ केला. तेव्हा नवनिर्वाचित सदस्यांनी भारत बोबडे यांना सरपंचपदी तर त्यांची पत्नी सुशीला भारत बोबडे यांना उपसरपंचपदी नियुक्त केले.
सामाजिक कार्यात अग्रेसर
भारत बोबडे हे सामाजिक कार्यात सदैव अग्रेस असतात. गावात त्यांचे मोटार रिवाईंडिंगचे छोटेसे दुकान आहे. गावास सातत्यपूर्ण पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यामुळे १२०० लोकसंख्या असलेल्या लावणा गावातील नवनिर्वाचित सदस्यांनी बोबडे पती-पत्नीला गावाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी स्वखुशीने दिली आहे. या अनोख्या योगायोगाची सध्या तालुक्यात चर्चा आहे.
(फोटो आहे)
(फोटो )