मेहकर : तिसरे लग्न करण्यासाठी पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलीला घराबाहेर काढणाऱ्या पतीस न्यायालयाने दणका दिला आहे़ या पतीस मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये आणि दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आदेश मेहकरचे प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस. ए. सुरजुसे यांनी दिले़
पीडित महिलेच्या वतीने अजयकुमार शंकरराव वाघमारे यांनी याचिका दाखल केली हाेती़ राजेश अर्जुन जाधव, असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर, पीडब्ल्यूडी कार्यालय बुलडाणा आणि त्याच्या इतर नातेवाईकांविरोधात विवाहितेने कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा, २००५ अन्वये मेहकर न्यायालयामध्ये दाद मागितली होती. यामध्ये पती राजेश अर्जुन जाधव याने लग्नाच्या वेळी कमी वय सांगून आपल्याबराेबर लग्न केल्याचा आराेप याचिकेत केला हाेता़ तसेच लग्न केल्यावर राजेश जाधव याच्या अनैसर्गिक, विकृत आणि मानवी कृतीला विवाहितेस सामोरे जावे लागले. राजेश जाधव याने विवाहित महिलेचे लैंगिक, आर्थिक, मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप याचिकेत केला हाेता. तसेच त्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी संगनमत करून वेळोवेळी विवाहितेला तिच्या पालकांकडून प्लॉट घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी पैशाची मागणी केली. या मागण्या पूर्ण करूनही त्याने शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिसरे लग्न करण्यासाठी विवाहितेला आणि तिच्या आठ वर्षाच्या मुलीला काेराेना काळातही त्याने बाहेर काढले़ त्यामुळे, विवाहितेने न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. त्यावर सुनावणी करताना मेहकर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी मुलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी व ऑनलाईन क्लासेस जॉईन करण्यासाठी रुपये एक लाख १५ दिवसाच्या आत जमा करण्याचे आदेश राजेश अर्जुन जाधव याला दिले आहे. तसेच मुलीला पाच हजार रुपये व घरभाडे दरमहा पाच हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला़