बुलडाणा: सध्या सर्वत्र कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २४ हजार १०७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरुवातीच्या काळात सुरक्षितपणे काळजी घेतली. परंतु आता पुन्हा मास्क, हातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेची खबरदारीच प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा नियम पाळल्यास आपण या कोरोनापासून दूर राहू शकतो. कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात शिरकाव होताच प्रत्येकाने नियम पाळण्याकडे लक्ष दिले. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हात आपण व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने हात धुणे आणि सॅनिटायझरचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. परंतु आता जेव्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे, तेव्हा नागरिकांकडून या नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येते. लस आल्यापासून अनेक जण आपल्याला काही होत नाही, या आविर्भावात विनामास्क बाहेर पडत आहेत.
जीव गुदमरतोय म्हणून मास्क लावत नाही
मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मास्क का वापरत नाहीत, याविषयी शहरातील काही दुकानदार व ग्राहकांना विचारणा केली असता, जीव गुदमरतोय म्हणून मास्क लावत नाही, असे सांगण्यात आले.
मॅडम आल्या, मास्क लावा...
बुलडाणा शहरातील प्रत्येक चौकामध्ये सध्या वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुरुवातीचे काही दिवस मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु कारवाई करणारेच नियमाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची गाडी येताच मास्क न लावलेल्या एका वाहतूक पोलिसाची धांदल उडाल्याची घटना येथील स्टेट बँक शाखा परिसरात शुक्रवारी घडली. त्यामुळे मॅडम आल्या, मास्क लावा, असा सूर यावेळी ऐकायला मिळाला.
विषाणूंचा फुप्फुसापर्यंतचा प्रवास
सध्या कोरोचा विषाणू कुठे असेल, हे कोणीही सांगू शकत नाही. आपण हात कुठेही लावतो. त्या वस्तूला चिकटलेले विषाणू आपल्या दोन बोटांमध्ये किंवा नखांमध्ये चिकटून राहतात. आपण ज्यावेळी नाकाला तोंडाला हात लावतो, त्यावेळी ते तोंडात किंवा नाकात जाऊन अगदीसहज फुप्फुसापर्यंत पोहोचतात, असे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंजाब शेजोळ यांनी सांगितले.
बाहेर जाताना प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. शिंकताना, खोकताना तोंडाला रुमाल लावावा. गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नये. अनावश्यक गर्दीत जाणे टाळावे. नियमित हात स्वच्छ धुवावेत.
- डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
२४,१०७
आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह
३,४६९
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
२१५
कोरोनाबाधितांचा मृत्यू