- नानासाहेब कांडलकर लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तरुणांमधील कामवासनेची भावना ही निकोप समाज व्यवस्थेसाठी घातक बनत चालली आहे. जळगाव तालुक्यातील खेर्डा खुर्द येथील एका विवाहित तीस वर्षीय तरुणाने शुक्रवारी रात्री आपल्या घराशेजारील एका ५० वर्षीय दिव्यांग अविवाहित महिलेवर दारूच्या नशेत अत्याचार केला आणि आपली बदनामी होऊ नये. म्हणुन त्या महिलेला यमसदनी पाठविले हे कृत्य घडल्यानंतर रात्री तो आपल्या घरी गेला आणि पत्नीसह कुटुंबीयांना याची माहिती सुद्धा दिली.शनिवारी सकाळी या घटनेने समाजमन हळहळले. पोलीस यंत्रणा सज्ज झाली.त्यांनी आपल्या पद्धतीने तपासाची चक्र फिरविली आणि अवघ्या चार तासात आरोपीचा शोध घेतला.या आणि अशा काही घटनेने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. सुमारे दोन वषार्पूर्वी तालुक्यातील आसलगाव येथे सुद्धा अशीच घटना घडली होती. आपल्या शेतात कापूस वेचणीचे काम करीत असणारी 47 वर्षीय महिलेला त्याच गावातील कामांध 28 वर्षीय तरुणाने शेतात जाऊन वासना शमविण्याची मागणी केली. तसा प्रयत्नही त्यांनी केला. दोघांची झटपट झाली. आता ही महिला आपली बदनामी करेल.म्हणून अत्यंत क्रूरपणे त्या महिलेची हत्या केली आणि ओसाड विहिरीत प्रेत ढकलून ते गवताने झाकून दिले. काल खेर्डा येथे घडलेल्या घटनेने आसलगाव येथील घटनेची आठवण ताजी झाली.खेर्डा खुर्द येथील कुमारी महिला ही दिव्यांग होती. आपल्या चुलत भावाच्या घरात एकटीच राहत असे. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवीत असे.स्वभाव अत्यंत सालस व मनमिळाऊ होता असे गावकरी सांगतात. काही एक दोष नसताना दारूच्या नशेत रितेश देशमुख या विवाहित तरुणाच्या अंगात शैतान शिरला, कामवासणा प्रबळ झाली. आणि या सैतानाने निरपराध महिलेचा बळी घेतला. हैदराबाद,दिल्ली पासून ते जळगाव जामोद तालुक्यापर्यंत घडणाऱ्या ह्या घटना तरुणांच्या कामांधतेमुळे घडल्याचे दिसून येते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनीसुद्धा या सैतानी वृत्तीला लगाम घालण्याची गरज प्रतिपादित केली.विशेष म्हणजे आजच्या तरुण पिढीमध्ये मोबाईल वरील अश्लील पोस्टमुळे हे घडत असावे अशी शंका व्यक्त होत आहे. प्रश्न असा आहे की हे कशामुळे घडते यापेक्षा त्याला रोखण्यासाठी काय करता येईल याचे चिंतन होण्याची गरज आहे.भारतीय संस्कृती लयाला?भारतीय संस्कृती सर्व श्रेष्ठ मानल्या जाते. येथील कुटुंब व्यवस्था व आपापसातील जिव्हाळा हा अधोरेखित करण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर तरुणांनी कामांधतेच्या आहारी जात, या संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरुणांनी स्वत:ला मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. हैदराबाद येथील घटनेने तरुण धडा घेतील असे वाटत असताना खेर्डा खुर्द येथील विवाहित तरुणाने या वृत्ताची शाही वाळण्यापूर्वी शैतानी वृत्तीचा अवलंब करीत एका निरपराध कुमारी दिव्यांग महिलेला वासनेची शिकार बनवत यमसदनी पाठविले. पोलीस विभागाने आरोपीचा त्वरित शोध घेतला. त्यामुळे समाजाच्या रोषाचा अनर्थ टळला. अन्यथा या घटनेचे महाराष्ट्रासह देशात प्रतिसाद उमटले असते.एका महिलेची वेदना दुसरी महिलाच जाणू शकते. याचे प्रत्यंतरही आजच्या तपासात दिसून आले. आरोपीच्या पत्नीने घडलेली हकीकत पोलिसांना सांगून मोठे सहकार्य केले.भविष्यात आरोपीला मृत्युदंडासारखी मोठी होऊ शकते. परंतु तरुणांमधील कामांधतेचा विषय मात्र कायमच राहतो. याला पायबंद कसा घालता येईल याचे चिंतन शासकीय स्तरावर व समाज व्यवस्थेत झाले पाहिजे. अन्यथा असे प्रसंग घडून कोणतीही महिला ही वासनेची शिकार बनून तिला या जगातून कायमचे दूर केल्या जाऊ शकते.तरुणांमधील वाईट प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी भविष्यात पोलीस विभागाकडून प्रबोधनासाठी नियोजन केले जाईल. समाजातील अशा घटनांनी पोलीस खात्यावर फार ताण येतो कारण हे विषय अत्यंत संवेदनशील व भावनिक असतात. समाजमन त्यामुळे दुखावते व पेटून उठते. खेर्डा खुर्द येथील घटनेत आरोपी त्वरित मिळाल्याने असंतोष शमला आहे.- दिलीप भुजबळ पाटीलजिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा
तरुणांची कामांधता बनली चिंतेचा विषय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 2:49 PM