शेगाव - काँग्रेसच्या भारत जोदो यात्रेदरम्यान विदर्भ दौऱ्यावर असलेल्या खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी साडेचार वाजता गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती. त्यानंतर, राहुल गांधींनी शेगावमधून जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी, राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधत भाजपकडून देशात द्वेष पसरवण्यात येत असून हिंसेचं राजकारण करण्यात येत असल्याचं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू , फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र असून कोणीही द्वेष पसरवण्याचं सांगितलं नाही. मात्र, विरोधकांकडून द्वेष पसरवण्यात येत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं.
७० दिवसांपूर्वी मी भारत जोडो यात्रेला सुरुवात केली असून दररोज २५ किमींचा पायी प्रवास आमचा सुरू आहे. या प्रवासात अनेक राज्यातून येत मी महाराष्ट्रात पोहोचलो आहे. तिरस्काराने कधीही या देशाला फायदा झाला नाही, प्रेमानेच देश पुढे जातो. कुटुंबात द्वेष पसरवल्यानंतर कुटुंबाचं भलं होत नाही. मग, देशात द्वेषाचं राजकारण केल्यानंतर देशाला फायदा होईल का? असे म्हणत राहुल गांधींनी उपस्थित जनसमुदायालाच सवाल केला.
विरोधक म्हणतात यात्रेची गरजच काय, पण भाजपने द्वेषाचं राजकारण केलं असून आम्ही प्रेमाचं राजकारण समजावून द्यायला ही यात्रा सुरू केल्याचं राहुल गांधींनी म्हटलं. या यात्रेच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी संवाद साधतोय. पण, मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलोय. लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. मी यात्रेत फिरत असताना जिथे जाईल तिथे मला एकच प्रश्न सातत्याने ऐकायला मिळतोय. आमच्या मालाला भाव मिळत नाही, असे प्रत्येक शेतकरी सांगतोय. काही हजारांच्या कर्जासाठी आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, पण देशात बड्या उद्योगपतीचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज माफ होतंय, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
बाळापूर ते वरखेड पायी प्रवास
खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भारत जोडो यात्रेचे शुक्रवारी सकाळी शेगाव येथे आगमन झाले. बाळापूर ते वरखेड फाट्यापर्यन्त पायी प्रवास केल्यानंतर खा. गांधी यांनी वरखेड फाट्यावर काही वेळ विश्राम केला. त्यानंतर खा. राहुल गांधी आणि काही काँग्रेस नेते वाहनाने दुपारी विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज मंदिरात पोहोचले. यावेळी श्री गजानन महाराज संस्थानकडून व्यवस्थापकीय विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी खा. गांधी यांचा यथोचित सत्कार केला. श्रींचे दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी यांची जाहीर सभेच्या ठिकाणी रवाना झाले.