आम्ही तर वडिलांसोबत आजीआजोबाही गमावले...
कुटुंबाचा आधार हे वडील असतात आणि हाच आधार गमावण्याची वेळ या कोरोनाने आमच्यावर आणली आहे. आम्ही केवळ वडीलच नाही, तर आजीआजोबाही गमावले आहेत. वडिलांच्या प्रेमाबरोबरच आजीआजोबाही आमच्यापासून दूर गेले. कधी बाहेर एकट्याने गेलो नाही. मात्र, आता ही वेळ कशी आली. वडिलांच्या प्रेमाबरोबरच रोजीरोटीही हिरावून नेली आहे. आता आम्हाला आईच आशेचा किरण आहे. पण, ज्यांच्या आईने कधी बाहेरील काम केले नाही, अशा मातोश्रींना मात्र आता उंबरठा ओलांडून बाहेर पडावे लागणार आहे. कुटुंबात नेहमी निर्णय घेण्याची जबाबदारी वडिलांची असते. पण, आम्ही वडीलच गमावल्याने ही जबाबदारीही आईवरच येणार आहे. मृतांमध्ये
कित्येक पती-पत्नी एकमेकांना सोडून गेले आहेत. याहीपेक्षा दु:खाची बाब म्हणजे, कित्येक लहानांचे पालकच त्यांच्यापासून हिरावून नेले आहेत.
आई-वडील दोघेही गमावले
कोरोनाने आई-वडील गेलेल्या अशा मुलांना फार मोठा धक्का बसला आहे. आता कोणाकडे त्यांनी मायेने पाहायचे आणि कोणाच्या कुशीत शिरायचे, या वास्तवाने दिवसेंदिवस त्यांना होणाऱ्या दु:खाची तीव्रता वाढतच आहे. आमच्यासारखेच गावात अन्य काही कुटुंबांमध्येही असेच दुःख आहे. ज्यांना काका-काकी, मामा-मामी, आत्या असे नातलग आहेत, त्यांना थोडीफार जमेची बाजू आहे. निदान, दोनवेळचे जेवण आणि कपडालत्ता तरी उपलब्ध होईल. परंतु, ज्यांना असे नातलग नाहीत, त्यांना फार मोठे दुःख सहन करावे लागणार आहे. समाजाने जरी अशांना सांभाळले तरी, झालेले दुःख पचविणे आणि येणारे दिवस घालविणे, हे खूपच कठीण आहे.
आईच्या मायेविना पोरके
आईशिवाय घराला घरपण येत नाही, असे म्हणतात, ते काही खोटे नाही. हट्ट पुरविण्यासाठी वडील जरी पैसे देत असले, तरी हट्ट हा नेहमी आईकडेच केला जातो. कोरोनाने आम्हाला आईच्या मायेला पोरके केले आहे. वडील असल्याने आम्हाला एक खंबीर आधार आहे. आम्हाला आईची उणीव भासू न देता संपूर्ण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी वडिलांवर आली आहे. आर्ईविना घर सुनेसुने वाटत आहे. आईविना पुढील जीवन कसे कटणार, याची भीती आतापासूनच आमच्या मनात आहे. आई आपल्यासोबत आता कायमची नसणार आहे, याची जाणीव आम्हाला पदोपदी होत आहे. इतरांची आई पाहिल्यानंतर आम्हालादेखील आमची आई हवी होती. तिच्यावाचून आता संपूर्ण आयुष्य कसे जाणार? आपल्याला कोण मार्गदर्शन करणार, या विचाराने रात्रीची झोपच लागत नाही.
जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा आढावा
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण - ८५४१५
बरे झालेले रुग्ण -८३५८४
सध्या उपचार सुरू असलेले - १२०२
एकूण मृत्यू - ६२६
१८ जणांचे छत्र हरपले
ज्या वयात लहान मुलांना आई-वडिलांचे प्रेम आवश्यक असते, त्याच वयात आई-वडिलांना गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोरोनाकाळात जिल्हा कृती दलामार्फत एकूण १८ बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये ४ बालकांना आई-वडील नाहीत. या मध्ये २ मुली व २ मुले आणि १४ बालके ही कोरोनामुळे एक पालक झालेली आढळून आलेली आहेत. ज्यामध्ये ८ मुली व ६ मुले आढळून आलेली आहेत. या बालकांची प्राथमिक चौकशी सुरू असून त्यांना बालकल्याण समितीमार्फत पुढील पुनर्वसनासाठी हजर करण्यात येणार आहे.