माझं माहेर माहेर...
आई, बाबा या दोन शब्दांत जणू आपले सर्व विश्व सामावले आहे. आईची फार आठवण येते. तिला भेटावयाची इच्छा होते, पण काय करावे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधामुळे एवढ्या अंतरावरून येणे शक्य नाही. वर्षभरापासून आईची भेट नाही. यामुळे जीव कासावीस झाला आहे.
गौरी बुक्कावार.
गाड्या बंद असल्यामुळे मी आईला भेटायला जाऊ शकत नाही; परंतु कोरोना महामारीच्या या संकटात स्वत:ला व कुटुंबाला सावरणे, त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनारूपी संकट लवकर पळून जावे, हीच इच्छा.
भारती खर्चे
आता कडक निर्बंध लागू आहे. वाहतूकही ठप्प आहे. माझे माहेर बाहरेच्या जिल्ह्यातील असल्यामुळे आर्डवडिलांच्या भेटीला जाता येत नाही. त्वरित कोरोनाचा नायनाट होवो व तूर्तास मायलेकींच्या भेटीगाठी व्हाव्यात, अशीच इच्छा आहे.
प्रियंका क्षीरसागर
लागली लेकीची ओढ...
कोरोनाने काही मुलींना आपल्या आईच्या शेवटच्या दर्शनालादेखील जाता आले नाही. ही महामारी अजून कित्येक मायलेकींना दूर करणार कुणास ठाऊक. ही महामारी लवकर जावो, हीच ईश्वराकडे प्रार्थना.
माया पानट
माझी मुलगी वर्षापासून मला भेटली नाही. ती बाहेरच्या जिल्ह्यात राहते. कधी टीव्हीवर कोरोनाची माहिती ऐकली तर मन सुन्न होते. माझी प्रकृतीही कधी बिघडलेली असते. लोकांचे ऐकून भीती वाटते.
कमल पवार
लेकीच्या भेटीसाठी माझे मन व्याकुळ झाले आहे. कधी हा कोरोना जातो आणि मी माझ्या लेकीला भेटते असे झाले आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे तिला भेटतासुद्धा येत नाही, कधीही नजरेच्या आड न जाणारी माझी मुलगी आज अनेक दिवसांपासून भेटली नाही. त्यामुळे तिची खूप आठवण येते.
अलका देशमुख
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार?
वर्ष झाले शाळाही बंद आहे. कुठे येणे-जाणे बंद आहे. कोरोनाने मामाच्या गावाला जायची मज्जाच हिरावून घेतली आहे. मामाच्या गावाला कधी जायला मिळणार?
दीप पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे यंदाही घरीच राहावे लागत आहे. घरात बसून बसून कंटाळा आला आहे. मामाच्या गावाला केव्हा जायला मिळते, याची आस लागली आहे.
उत्कर्ष वानखडे
वर्षभरापासून मामा मोबाईलवरच दिसतो. मामाच्या गावाला जावे, मस्ती करावी, पण काहीही नाही. कोरोना जाईल तेव्हा मामाच्या गावाला जाऊ असे वाटतेय.
यश जाधव.