भूमिपुत्रांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात खरात यांची ग्वाही
सिंदखेडराजा : जगाच्या पाठीवर आपलाच झेंडा फडकावत ठेवायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तरुणांनी अधिकाधिक शिक्षण घेण्याची गरज आहे. यासाठी सिंदखेडराजासारख्या ग्रामीण भागात आधुनिक शिक्षणाची व्यवस्था उभारायची आहे, असे प्रतिपादन उच्च शिक्षण विभागाचे सचिव तथा उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक सिद्धार्थ खरात यांनी येथे केले.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील उत्कर्ष महाविद्यालयात यशस्वी भूमिपुत्र प्रा. नरेश बोडखे, साहित्यिक डॉ. विशाल इंगोले यांना अनुक्रमे उत्कर्ष शिक्षणरत्न व उत्कर्ष साहित्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामान्यातील सामान्य घरातील मूल आज शिक्षण घेऊन स्वतःला सिद्ध करीत आहे. त्यामुळे आपल्या भागातील मुलांनीही लक्ष्य निश्चित करून शिक्षणाच्या या प्रवाहात येणे गरजेचे आहे. त्यासाठी उत्कर्ष कायम आपल्याला साथ देईल, असेही खरात यांनी सांगितले. उच्च शिक्षित प्रा. नरेश बोडखे यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेच्या कॉमर्स विभागात संचालक म्हणून निवड झाली, तर कवी डॉ. विशाल इंगोले यांना राज्य सरकारच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य म्हणून निवड झाल्याने या दोन्ही भूमिपुत्रांचा सन्मान करण्यात आला. बोडखे यांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या या भूमीच्या उत्कर्षासाठी आपण कायम प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर इंगोले यांनी घरातील प्रेमामुळे भारावून गेल्याचे म्हटले. कार्यक्रमाला निवृत्त प्राध्यापक बळवंत विचारे, गोविंद गोंडे, सुवर्णा खरात, शिवाजी राजे, प्रवीण गीते, प्राचार्य सुनील सुरुले यांच्यासह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.