लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पुन्हा पुन्हा घोळवलेले विचार अंतर्मनात जातात व जीवनात साकार होतात. माणसाच्या अंतर्मनात प्रचंड ईश्वरीशक्ती वास करते. म्हणून तिला अशक्य असे काहीही नाही. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले.मोताळा येथील सहकार विद्या मंदीर, मराठी प्राथमिक शाळा (शेलापूर) व स्व. बबनराव देशपांडे विद्यालय या शाळांतील विद्यार्थ्यांना जीवनविद्या विद्यार्थी मार्गदर्शन अभियानात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. आपले जीवन बुवा- बाबा, भगत- फकीर, गंडे- दोरे, उदी- भस्म घडवत नाही. सटवी पाचवीच्या दिवशी आपल्या कपाळावर आपले नशीब लिहीत नसून आपण घडवू तसे आपले नशीब घडते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस शिकत असतो म्हणून क्षणाक्षणाला शिकले म्हणजे शिक्षण होय. अभ्यासाला सर्व काही शक्य आहे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा असा संदेश त्यांनी दिला. साधी सोपी अभ्यासाची पध्दतही त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविली, असे ते म्हणाले.माता, पिता, शिक्षक, सदगुरू व आत्मदेव हे खºया अर्थाने चालते बोलते पाच देव आहेत. हसत - खेळत झालेले हे व्याख्यान विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरले व विद्यार्थी तर अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन समरस झाले होते. ऐकताना त्यांना वेळेचेही भान नव्हते. हे पाहून शिक्षकवृंद सुध्दा अचंबित झाले होते. पुन्हा पुन्हा या व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती केली व या अभियानाचे कौतुक सुध्दा केले. या प्रसंगी मुख्याध्यापक अभिजित देशमुख , पर्यवेक्षक राजपूत , सुनिल बराटे , जीवनविद्या मिशनचे पुरूषोत्तम टेकाडे , संदिप तायडे, दोन्ही शाळांचे शिक्षकवृंद व जीवनविद्या मिशनचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सतत उच्च ध्येयाचा विचार हाच यशाचा मार्ग: संतोष तोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 2:10 PM