लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी राज्यासह देश- विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने शहरात येतात; परंत येथे येणाऱ्या पर्यटक प्रवाशांना बसस्थानकावरील समस्यांचा सामना करावा लागतो. मातृतीर्थावर येणाऱ्या पर्यटकांना तसेच प्रवाशांना बसस्थानकाशिवाय बाथरूम व प्रसाधनगृहाची कोठेच व्यवस्था नाही. बसस्थानकावरच जावे लागते. बसस्थानक परिसरात स्थानिक नागरिक दररोज मोकळ्या जागेत प्रातर्विधी करतात. परिसरातील हॉटेलवाले बसस्थानकाजवळच घाण पाणी, कचरा, उरलेले शिळे पदार्थ टाकतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मानव विकासाच्या बसगाड्या नियोजित वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थिनींचे हाल होतात. गेल्या सहा महिन्यांपूर्वी बसस्थानकाला संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर झाला. वर्क आॅर्डर मिळाले, तरीही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. अशा अनेक समस्यांनी बसस्थानक ग्रासले आहे. बसस्थानकाच्या उद्घाटनावेळी बसस्थानकावर लावलेला शहराच्या नावाचा फलकही जीर्ण झाल्याने काढून टाकला. बसस्थानकवरून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातल्या एका दिवसात अंदाजे दोनशे बसगाड्यांची नोंद बसस्थानकावर होते. घाणीच्या अस्वच्छतेचा व दुर्गंधीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. बसस्थानकावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. प्रवासी व खासगी गाड्या प्रांगणात उभ्या राहात. ग्रामीण भागात मानवविकासच्या तीन बसेस धावतात. त्या तीनही बसेस मेहकरवरून नियोजित वेळेत न आल्यामुळे विद्यार्थिनींचे व विद्यार्थ्यांचे हाल होतात. सिंदखेडराजा ते बोराखेडी गंडे रुटवर ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी पासधारक आहेत. तर सिंदखेडराजा ते गारखेडा रुटवर ३०० ते ३५० विद्यार्थी व सिंदखेडराजा ते ठोसा रुटवर ३०० विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवास करीत असून, त्यांना त्रास सहन करावा लागतो. संरक्षण भिंतीचे बांधकाम त्वरित सुरू करून घाणीचे साम्राज्य दूर करणे काळाची गरज आहे. नियोजित वेळेवर गाड्या पाठविण्यात याव्या व वरील समस्या दूर करण्यासाठी वेळोवेळी वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आले.- युनूस पठाण, वाहतूक व्यवस्थापक, सिंदखेडराजा.
सिंदखेडराजा बसस्थानकाला समस्यांचा विळखा
By admin | Published: July 17, 2017 1:52 AM