बुलढाणा: सर्व धर्मनिरपेक्षा पक्ष एकत्र येऊन भाजपचा २०२४ मध्ये पराभव करू शकतात. परंतु, पाटण्यामध्ये झालेल्या सभेला एमआयएमसह, बीएसपीलाही बोलावण्यात आले नव्हते, ही बाब अनाकलनीय आहे असे एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन अेावेसी यांनी मलकापूर येथे २४ जून रोजी रात्री बोलताना सांगितले .एमआयएम पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने ते मलकापूर येथे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीस एमआयएमला बोलविण्यात आले नसल्याचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष खा. इमतियाज जलील यांनी उपस्थित केला असल्याचे सांगत बीएसपीच्या मायावती यांनाही या बैठकीला आमंत्रीत केले नव्हते. ते असे करत असतील तर भाजपचा पराभव करणे त्यांना शक्य नाही. भाजपचा २०२४ मध्ये पराभव करायचा असले तर धर्मनिरपेक्षा पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे असेही ओवेसी म्हणाले. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा आपण आदर करतो, असेही ते म्हणाले. दुसरीकडे बीआरएसच्या राज्यातील राजकारणातील एन्ट्री बाबात विचारले असता प्रत्येक पक्षाला त्याचा पक्ष वाढविण्याचे स्वातंत्र्य असल्याचे ते म्हणाले.
दुसरीकडे २०१४ ते २०२३ दरम्यान देशात अल्पसंख्यांक आदिवासी व दलीत समाजाचे मोठे नुकसान झाले. मनिपूरमधील हिंसाचारही त्यात आला आहे. संविधान वाचविण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज ही त्यांनी व्यक्त केली.