ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : टोमॅटोला मिळणाऱ्या अत्यल्प भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतकरी मरणाच्या दारात मात्र सरकार बघ्याची भूमिका घेते. आत्महत्या केल्यावर लाख रुपयांचा चेक घेऊन फोटो काढल्यापेक्षा आत्महत्या करू नये, म्हणून आधीच काही पॅकेज द्यावे. शेतकरी टिकला, तर राज्य टिकेल, देश टिकेल असे मत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.
त्या बुलढाणा येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर, मुधकर शिंगणे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मधुकर शिंगणे यांनी दोन एकर शेतात टोमॅटो पीक घेतले. त्यांना एक किलोचा उत्पादन खर्च ८ ते १० रुपये आला. त्यानुसार जवळपास २ लाख रुपये उत्पादन खर्च आला आहे. परंतू आजरोजी टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्याची खंत दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आहेत. शेतात पानापेक्षा टोमॅटो जास्त आहेत. शेतात उभे असलेले हे पीक म्हणजे पोटच्या लेकरासारखे आहे, ते जर असे मरत असेल, तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल.
सध्या मात्र कष्टावर माती पडल्याच्या भावनाही दिशा पिंकी शेख यांनी यावेळी व्यक्त केल्या. स्वतःच्या खुर्चीचे चार पाय टिकावेत म्हणून सरकार काही करायला तयार आहेत. शेतकऱ्यांचा माल मुंबईपर्यंत जाऊ शकतो, त्यासाठी रेल्वेमध्ये दोन डबे कोल्ड स्टोरेज करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भाजीपाल्याला हमीभावाच्या कक्षेत घ्यावे, असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार - तुपकर
टोमॅटोला भाव मिळत नाही. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत टोमॅटोचे पार्सल मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्या प्रमाणे सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, कपाशी या पिकांना हमीभाव दिला जातो. त्या प्रमाणे भाजीपाला वर्गीय पिकांनाही हमीभाव द्यावा, से मत तुपकर यांनी व्यक्त केले.