- सोहम घाडगे
बुलडाणा: वेटलिफ्टींग खेळामध्ये खुप संधी आहेत. कष्ट घेण्याची तयारी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर या खेळात यश हमखास मिळते. मुलींनी वेटलिफ्टींगकडे वळले पाहिजे. पालकांनीही त्यांना पाठींबा देऊन सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात. ेवेटलिफ्टींगमुळे मुलींच्या आरोग्यावर अजिबात परिणाम होत नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजत आणि कांस्यपदक मिळविल्यानंतर आता सुवर्णपदक मिळविण्याची मनीषा असल्याचे आंतरराष्ट्रीय वेटलिफटींग खेळाडू तृप्ती माने हिने सांगितले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ती बुलडाण्यात आली असता तिच्याशी संवाद साधतांना तीने सांगितले.
प्रश्न : वेटलिफ्टींग खेळाकडे कशा वळल्या ?या खेळाबद्दल मला जास्त माहिती नव्हती. शाळा आणि अभ्यास असाच दिनक्रम असायचा. शाळेत इतर खेळाडूंना वेटलिफ्टींग खेळताना बघितले. हळूहळू आवड निर्माण झाली. पाचवीत असताना वेटलिफ्टींगमध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला फारशी चांगली कामगिरी करता येत नव्हती. मार्गदर्शकांनी वेळोवेळी धीर देऊन प्रोत्साहित केले. कुटूंबियांनी भक्कमपणे पाठींबा दिला. त्यामुळे या खेळात स्थिर होता आले.
प्रश्न : वेटलिफ्टींगमध्ये तुम्ही केलेली पहिली चांगली कामगिरी कोणती ?खेळासाठी खूप मेहनत घेत होती. अनेक स्पर्धामध्ये सहभागी व्हायची. मात्र जिल्हा, विभागस्तरापर्यंतच मजल पोहचत होती. त्यामुळे बऱ्याचदा निराशा येत होती. नववीत असताना पहिल्या वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथे ही स्पर्धा झाली. तिथे चांगली कामगिरी केली आणि सुवर्णपदक मिळविले. सुवर्णपदक मिळविल्याचा खुप आनंद झाला. मात्र त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुपटीने आत्मविश्वास वाढला.
प्रश्न : वेटलिफ्टींगमधील तुमचे आदर्श कोण आहेत?शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मला खेळात यश आणि ओळख मिळाली. विजय माळी, विजय टारे, रवींद्र चव्हाण यांचेही नेहमीच मार्गदर्शन लाभते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उंचावणारी कर्नाम मल्लेश्वरी माझी आदर्श आहे. खेळाप्रती असलेली तिची निष्ठा, मेहनत मला भूरळ घालते.
प्रश्न : मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही मिळविलेले पदक ?आतापर्यंत पाच राष्ट्रीय व तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. आॅस्ट्रेलियामधील गोल्डकोस्ट येथील युथ आॅलम्पिक चॅम्पीयनशिपमध्ये रजत पदक, उझबेकिस्तान युथ एशियन चॅम्पियशनशिपमध्ये कास्य पदक, थायलंड युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप, खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक व उत्कृष्ट वेटलिफ्टर पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न : स्पर्धांमधील सुविधांबद्दल समाधानी आहात का?प्रत्येक स्पर्धेचे आयोजन, सुविधा व प्रशिक्षण यामध्ये फरक असतो. आपली नेहमीची सरावाची पध्दत वेगळी असते. तर मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आयोजित कॅम्पमधील प्रशिक्षण यामध्ये फरक असतो. त्यामुळे थोड्या अडचणी येतात. स्पर्धेत पुरविल्या जाणाºया सुविधा चांगल्या असतात. बुलडाणा येथील राज्यस्तरीय स्पर्धेत खुप चांगल्या सुविधा मिळाल्या. तसेच आयोजकांनी खेळास पोषक वातावरणनिर्मिती केली. त्यामुळे कामगिरी उंचावण्यास मदत झाली.
प्रश्न :ग्रामिण भागाातील तरुणींना कोणता संदेश द्याल ?खेळामध्ये ग्रामिण, शहरी असा भेद करता येणार नाही. मी सुध्दा ग्रामिण भागातील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरंदवाड हे माझे गाव. गुणवत्ता, मेहनत आणि मार्गदर्शन या त्रिसुत्रीमुळे कोणीही यश मिळवू शकते. तरुणींनी करिअर म्हणून खेळाकडे बघायला हवे. वेटलिफ्टींगमध्ये मुलींना खूप संधी आहेत.
प्रश्न : तुमचे ध्येय काय आहे ?प्रत्येक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी नोंदविण्यासाठी माझा प्रयत्न असतो. माझी मेहनत, गुरुंचे मार्गदर्शन व आई-वडिलांचा आशिर्वाद यामुळे अनेक स्पर्धेत यश मिळविले. मात्र अजून आंतर राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक मिळविता आले नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणे हे आपले धेय्य आहे.