उपवासाच्या दिवसांत साबुदाणा या फराळ पदार्थाची निवड हमखास केली जाते. मात्र, हाच पदार्थ तुमच्या शरीरातील आठवडाभरातील आहाराचे गणित बिघडून टाकतो. कारण, साबुदाण्यात असणाऱ्या अधिकच्या कॅलरीज, तुमच्या शरीरात जाऊन पचन पद्धतीवर परिणाम करतात. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांत शरीराची होणारी हालचाल पाहता आणि सेवन केलेले जड अन्न यामुळे बहुतांश वयोवृद्ध आणि बालकांची पचनपद्धती बदलून त्यांना पोटाचे विकार जडण्याची दाट शक्यता असते. असे जरी असले तरी उपवासाला बनविण्यात येणारा साबुदाणा खिचडीसारख्या पदार्थाची आपल्याकडची बनविण्याची पद्धतही तेलयुक्त असल्याने हा पदार्थ आणखी घातक होत असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हा घ्या उपवासाला आहार
उपवासाला साबुदाणा खाणे अपायकारक जरी असो तरी याच तुलनेत उपवासाला भगर खाणे अधिक चांगले असल्याची माहिती आहारतज्ज्ञांनी दिली आहे, तर यासोबतच फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असलेली फळे की, ज्यामध्ये पपई, डाळिंब, पेरू, सफरचंद या आणि अशा फळांचे सेवन करावे असे आवाहन आहारतज्ज्ञांनी केले आहे.
साबुदाणा, भगर स्थिर; शेंगदाणे वधारले
उपवासाच्या दिवसांत फराळांच्या पदार्थांचे भाव वाढतील अशी दाट शक्यता होती. मात्र, यंदा साबुदाणा, भगर, नयलॉन साबुदाणा या सर्व पदार्थांचे दर स्थिर असून, फक्त शेंगदाण्याचे दर वाढल्याची माहिती आहे. यामध्ये भगर १२० ते १४० रुपये प्रति किलो, साबुदाणा ६० ते ७० रुपये किलो, नायलॉन साबुदाणा १०० रुपये किलोप्रमाणे स्थिर भावावर विकला जात आहे, तर केवळ १०० ते १२० रुपये किलो असणारे शेंगदाणे आवक घटल्यामुळे १३० ते १३५ प्रति किलोने विकले जात आहेत.
उपवासाच्या दिवसांत कमी कॅलरीयुक्त अन्नांचे सेवन करावे, जेणेकरून शरीरातील पचनसंस्थेचे संतुलन अबाधित राहील. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या आणि कमी साखरयुक्त फळांचे केलेले सेवन कधीही फायद्याचे.
-नीलेश परदेशी, आहारतज्ज्ञ व आरोग्य सल्लागार