बुलडाणा: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाव्दारे आजपासून जिल्ह्यात दोन केंद्र सुरु होणार असून तेथे हमीदराने कापूस खरेदी सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने महासंघाचे खामगाव येथील प्रभारी विभागीय व्यवस्थापक व्ही.आर.लाडेकर यांचेसोबत साधलेला संवादप्रश्न : शेतकर्यांच्या सुविधेसाठी केंद्र वाढणार काय ?- सद्या जिल्ह्यात जळगाव जा.येथे सुपो जिनिंग व देऊळगाव राजा येथे नमन जिनिंग कंपनीत केंद्र सुरु झाले आहेत. दुसर्या टप्प्यात आणखी तीन ठिकाणी केंद्र उघडणे प्रस्तावित आहेत. सीसीआयकडून सुध्दा मलकापूर येथे कापूस खरेदी सुरु आहे. आवक वाढल्यास किंवा मागणी झाल्यास व गरज असल्यास जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. प्रश्न : कापसाचे भावात वाढ होवू शकेल काय?- महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाव्दारे कापसाची खरेदी केंद्र शासनाच्या हमीदराने करण्यात येत आहे. हमीदर हे पेरणीपूर्वीच केंद्र शासनाकडून ठरविले जातात. त्यानुसार हमीदर दिला जातो. हमीदरामुळे व्यापारी सुध्दा हमीदरापेक्षा कमी दरात शेतीमालाची मागणी करुन शेतकर्यांची अडवणूक करु शकत नाही. त्यामुळे पणन महासंघ शेतकर्यांसाठी चांगला पर्याय असून शेतकर्यांच्या पाठीशी असते.कापसाचे भाव काय?- केंद्रांवर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे एलआरए ५१६६ या जातीच्या कापसाच्या तंतुची लांबी २६ ते २६.५ व तलमता ३.४ ते ४.९ दरम्यान असल्यास ३८५0 रूपये या हमी दराने तसेच एच-४/एच-६ या जातीच्या कापसाच्या तंतुची लांबी २७.५ ते २८.५ व तलमता ३.४ ते ४.७ दरम्यान असल्यास ३९५0 रूपये या हमी दराने तसेच बन्नी/ब्रम्हा या जातीच्या कापसाच्या तंतुची लांबी २९.५ ते ३0.५ व तलमता ३.५ ते ४.३ दरम्यान असल्यास ४0५0 रूपये या हमी दराने कापूस खरेदी केल्या जाणार आहे. प्रश्न : खरेदी केंद्रावर उदघाटनालाही कापूस नसतो ?- व्यापार्यांकडून खेड्यापाड्यात जावून शेतकर्यांच्या घरुनच थेट कापसाची खरेदी होते. तर काही वर्षांंंअगोदर पणन महासंघाच्या कापूस खरेदीवरील गर्दी पाहता मोजमाज व्हायला विलंब होत होता. तर पैसे सुध्दा काही दिवसानंतर मिळत होते. त्यामुळे व्यापार्यांना कापूस विकण्यासाठी शेतकरी पसंती देत असतील. परंतु आता पणन महासंघाकडून सुध्दा त्वरित पैसे तसेच त्वरित मोजमाप होणार असल्याने शेतकरी निश्चीतच कापूस विकण्यासाठी पणन महासंघाकडे पुन्हा वळतील. प्रश्न : शेतमालाचे पैसे उशीरा का मिळतात ?- शेतकर्यांनी विकलेल्या शेतमालाचा मोबदला लवकरच देण्याचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे यावर्षी शेतकर्यांना खरेदी केलेल्या कापसाच्या मोबदलापोटीची रक्कम लवकरात लवकर म्हणजे शक्यतो तीन दिवसांमध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे कापुस उत्पादक शेतकर्यांना अडचण सहन करावी लागणार आहे. ही शेतकर्यांसाठी आनंदाची बाब आहे.
प्रतिसाद मिळाल्यास कापूस खरेदी केंद्र वाढवू
By admin | Published: November 14, 2014 10:38 PM