गावातून होणारी लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ पाहता, संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास मार्ग काढण्यात आला. परंतु, संबंधित विभागाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्यामुळे आज बायपास मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अवस्था बघून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील मुख्य मार्गावरच सर्व दुकाने तसेच शाळा-महाविद्यालयसुद्धा मार्गालगतच आहेत. मुख्य बाजारपेठेमुळे महिला व ग्रामस्थांची नेहमी असणारी गर्दी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि त्यातच अरुंद मुख्य रस्त्यावरूनच अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविण्याची हौस जडली आहे. त्यांच्या वाहनाच्या सुसाट वेगामुळे अपघाताची भीती अधिकच वाढली आहे. त्यामुळे बायपास मार्गाची दुरुस्ती तातडीने होणेेेे अत्यंत गरजेचे आहे.
नवीन रस्ता करण्याची गरज
बायपास मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गाची तात्पुरती मलमपट्टी आजपर्यंत अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु, ती अवजड वाहनांमुळे टिकत नसल्याने काही दिवसातच पुन्हा बायपास मार्गाची अवस्था जैसे थे होते. त्यामुळे वेळोवेळी दुरुस्तीवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा या मार्गाचे काम पुन्हा एकदा नव्याने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.