देऊळगाव राजा : शहर व तालुक्यात गत काही दिवसांपासून अवैध व्यवसाय माेठ्या प्रमाणात वाढले आहेत़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगारावर आतापर्यंत वेळाेवेळी कारवाई केली आहे़ मात्र, स्थानिक पाेलिसांचे या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे़
देऊळगाव राजा शहर हे मराठवाडा सीमेवर असून नागपूर पुणे या महामार्गावर आहे़ त्यामुळे शहर व परिसरात व तालुक्यामध्ये गुन्हेगारी व अवैध व्यवसाय वाढत आहे़ राष्ट्रीय महामार्गावर विविध धाबे तसेच शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये अवैध दारू विक्री खुलेआम विकण्यात येते़ याची दखल पोलीस अधीक्षक व त्यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी घेण्यात येते. याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या भरारी पथकाकडून अशा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली़ गत दोन ते तीन महिन्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या वतीने अवैध दारू विक्री परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा खंडणीचे प्रकरणे व इतर अनेक गुन्ह्यासंबंधी रीतसर कारवाई करण्यात आलेली आहे़ मात्र स्थानिक पोलीस यांच्याकडून अवैध व्यवसायांवर प्रतिबंध लावण्यात आलेला नाही़ आधीच कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे़ ४ जून रोजी देऊळगाव राजा शहरामध्ये कुंभारी परिसरामध्ये अवैध जुगार अड्ड्यावर छापा मारून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांनी दोन लाख रुपयांचा माल हस्तगत केला़ एकंदरीत असा प्रकार असला तरी देऊळगाव राजा तालुका व परिसरामध्ये अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे़ त्यामुळे अवैध धंद्यांवर स्थानिक पाेलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे़