मेहकर : जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणार सरोवराच्या ५00 मिटर परिसरात बांधकामाची परवानगी नसली तरी, शहरातील विविध भागात अवैध बांधकामं जोमात सुरु आहेत. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, अवैध बांधकामांमुळे हे पर्यटनस्थळ विद्रुप होत आहे. लोणार शहरामध्ये नगरपालिकेची परवानगी नसताना अवैध बांधकामं मोठय़ा प्रमाणात सुरु आहेत. त्यामुळे हा ठेवा धोक्यात आला आहे. नागरी सुविधांचे प्रश्नही निर्माण होत आहेत. सरोवराच्या ५00 मीटर परिसरात बांधकामास परवानगी नसतानाही बांधकामं सुरूच आहेत, हे विशेष. शहरालगतच्या शेतजमिनींना मोठय़ा प्रमाणात अकृषक परवाने देण्यात आले असून, हे प्रकार असेच सुरूच राहिले तर पर्यटनस्थळाची वाट लागण्यास वेळ लागणार नाही. लोणार सरोवराचा जागतिक दर्जाचा विकास करण्यासाठी कॅनडाची मदत शासन घेत आहे. गेल्या आठवडयात कॅनडाच्या तज्ज्ञांनी लोणारला भेट दिली.त्यावेळी लोणारच्या विकासासाठी स्थानिक रहिवाशांचे सहकार्य ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्याअनुषंगाने विचार केला तर विकासामध्ये स्थानिकांचा वाटा महत्वाचा असून, प्रशासनाचा अंकुशही तेवढाच महत्वाचा आहे.
लोणार पर्यटनस्थळी अवैध बांधकाम सुरू
By admin | Published: July 14, 2014 10:51 PM