मेहकर - समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैध व विना परवाना खोदकाम करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी ३६ काेटी १३ लाखाचा दंड केला हाेता. त्यानंतरही अवैध उत्खनन सुरूच असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
समृद्धी महामार्गाचे काम मागील काही काळापासून चर्चेत आहे. यात अवैध व विना परवाना खोदकाम आणि परवानगी घेऊनसुद्धा कित्येक ठिकाणी नियमबाह्य उत्खनन केल्या जात आहे. ज्या ठिकाणी तक्रार झाली फक्त त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे. समृद्धीच्या कामाला लागणारे गौण खनिज उत्खननासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून खोदकाम केले. त्यामुळे समृद्धी महामार्ग आंधरुड व डोणगाव शिवारात समृद्धी महामार्गलगतच मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. भविष्यात या खड्ड्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व समृद्धी महामार्गाला धोका निर्माण होऊ शकतो.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी खासगी जमीन घेतली व त्याची कोणतीही मोजमाप न करता सरळ उत्खनन करून गौण खनिज काढण्याचा सपाटा ठेकेदारकडून सुरू आहे. शासनाच्या नियमानुसार काही मीटरपेक्षा जास्त खोल उत्खनन करता येत नाही. मात्र मेहकर तालुक्यात डोणगाव परिसरात माेठमाेठे खड्डे खाेदण्यात आले. ४ जानेवारी २०२० रोजी मेहकर तहसीलदार यांनी अवैध व विना परवाना उत्खनन, शासकीय ई-क्लास जमीन उत्खननासाठी अँपको कंपनीवर जवळपास ४० कोटीची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र याव्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणात विना परवाना उत्खनन केलेले खड्डे स्थानिक महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीची वाट बघत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही खाे
मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथील पाझर तलावातील बुडित क्षेत्रात नसलेली परंतु संपादित क्षेत्रातील वहिती असलेल्या शेतजमिनीवर अवैध उत्खनन करण्यात आले होते. उमरा देशमुख येथील जमिनीवर खोदकाम करण्यात येऊ नये, अशी तक्रार उमरा देशमुख येथील शेतकरी मोहन गजानन गवई व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ खोदकाम थांबविण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र, त्यावर कारवाई झाली नाही.