लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना संचारबंदी दरम्यान धान्य वाहतूकीच्या मिनी ट्रकमधून सुरू असलेल्या गुटखा वाहतुकीचा प्रयत्न पोलिसांनी सोमवारी पहाटे हाणून पाडला. एसडीपीओ पथकाने केलेल्या धडक कारवाईत गुटख्याच्या १८ पोत्यांसह १२ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई चिखली बायपासवर करण्यात आली.चिखली येथील शेख आबीद शेख हसन (३३) हा इसम त्याच्या ताब्यातील मिनी ट्रक क्रमांक एम एच २८ एबी-५५९९ यावाहनातून मक्याचे पोते घेवून जात होता. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे एसडीपीओ पथकाने या वाहनाची झडती घेतली असता मक्याच्या पोत्याच्या मधात गुटख्याचे १८ पोते आढळून आले. विनापरवाना गुटखा वाहतूक केल्याचे निदर्शनास येताच गुटख्याचे १८ पोते, मिनी ट्रक क्रमांक एमएच २८- एबी- ५५९९ आणि मक्याचे २० पोते असा एकुण १२ लाख ८५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस स्टेशनला आणण्यात आला. पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन बुलडाणा यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. ही कारवाई उपविभागी पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकातील पो.ना. सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, पो कॉ. रविंद्र कन्नर, शुध्दोधन गवारगुरू यांनी केली.