चिखली(जि. बुलडाणा), दि. २0- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने २0 सप्टेंबर रोजी चिखली व लोणार येथे दोन ठिकाणी केलेल्या कारवाईतून ६३ हजार ५६९ रूपये किमतीची अवैध दारू मुद्देमालासह जप्त करण्यात आली असून याप्रकरणी सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गवळीपुरा भागात अवैध हातभट्टीच्या दारूची निर्मिती करून त्याची विक्री होत असल्याची माहिती मिळल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने याठिकाणी छापे टाकले असताना येथे ३२ लीटर हा तभट्टीची दारू, ८४९ लीटर सडवा रसायन आढळून आल्याने रमजान भुरान हिरीवाले, समाधानराव गवते, मुख्तार अहमद अब्दुल रहीम शेख, साहेबराव पुंडलीक फोलाने यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर दुसर्या प्रकरणात लोणार येथील गिट्टीखदान परिसरातील राजगढ ढाबा येथे टाकलेल्या छाप्यात १८0 मि.ली.च्या १0८ देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्याने कपिल दिलीपराव इंगळे, सचिन समाधान इरले, अंकुश शिवकांत महिराळ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या दोन्ही घटनेत अवैध दारूसह दोन मोटारसायकल व इतर असा एकूण ६३ हजार ५६९ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधिक्षक एस.एल.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली निरीक्षक के.डी.पाटील, दुय्यम निरिक्षक एम.के.उईके, मेहकर दुय्यम निरिक्षक ए.एम.शेख, सदुनि जी.एन.सोनकांबळे, जवान एन.ए.देशमुख, पी.एस.देशमुख, एन.एम.सोळंकी, एस.डी.जाधव यांनी केली आहे.
चिखली व लोणार येथे अवैध दारू जप्त
By admin | Published: September 21, 2016 2:27 AM