खामगाव: तालुक्यातील पिंप्री देशमुख शिवारातील शासकीय शेत गट नं ५४ मधून अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उजेडात आला. अवैध उत्खनन सुरू असताना कोतवाल, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी धडक देत मजुरांना रंगेहात पकडले. दरम्यान, पंचनामा सुरू असताना गौण खनिज माफियाने सरपंचाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्रामीण पोलीसांत करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील िपंप्री देशमुख आणि पारखेड शिवारात मोठ्याप्रमाणात अवैध उत्खनन केले जाते. खदानीतून विविध मशीनच्या साहाय्याने गौण खनिजाचे उत्खनन केल्यानंतर काढलेला मुरूम सपाट जागेवर टाकण्यात येतो. तेथून काही अंतरावर असलेल्या शेतातून या मुरूमाची विक्री केली जाते. याप्रकरणी पिंप्री देशमुख येथील सरपंच शेषराव गोरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
या तक्रारीत नमूद केले की, बुधवारी पिंप्री देशमुख शिवारात अवैध गौण खनिजाचे उत्खनन सुरू होते. अवैध उत्खनन रोखण्यासाठी मजुरांना मज्जाव केला असता उत्खनन करणार्या सुनिल गीरे यांनी दूरध्वनीवरून अश्लिल शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू होती.