डोणगांव : येथील स्थानिक रहेमत नगर, खंडोबा परिसर, नरसिंह नगरात आठ महिन्यांअगोदर रस्त्यावर विहिरीवरील डब्बर टाकून अर्धवट खडीकरण करण्यात आले होते़ त्यामुळे या रस्त्यावर चालताना कसरत करावी लागत होती़ कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांना अर्धवट खडीकरण करणाऱ्या एजन्सीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली हाेती़ त्यावर या प्रकरणी चाैकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले हाेते़
जिल्हा परिषद प्रशासनाच्या चाैकशीआधीच २७ एप्रिलला खंडोबा परिसरात अवैध मुरूम रस्त्यावर आणून टाकण्यात आला आहे़ याविषयी माहिती मिळताच जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी व राकाँचे उपाध्यक्ष संदीप पांडव, ग्रामपंचायत सदस्य जुबैर खान, सचिन साखळकर यांनी सदर रस्त्याची पाहणी करून सदर मुरूम कुणी टाकला याबाबत चौकशी केली़ हा मुरूम रात्री रस्त्यावर आणून टाकला व सकाळी तो रस्त्यावर पसरवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ विनारॉयल्टी मुरूम कोणी रस्त्यावर आणून टाकला याविषयी त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता सदर मुरूम ग्रामपंचायतने रस्त्यावर टाकला नसल्याचे सांगितले तर सदर अवैध मुरमाबाबत तहसीलदार मेहकर............ यांना विचारणा केली असता याबाबत आपणास माहिती नाही, चौकशी करतो असे सांगितले़ चौकशीआधीच मुरूम रस्त्यावर आल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, तसेच अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण हाेण्याची गरज आहे़