अवैध रेती उत्खनन उठले मजुरांच्या जीवावर; रेतीच्या कड्याखाली युवक दबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 3:34 PM
Buldhana News : रेतीच्या कड्याखाली युवक दबल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नांदुरा (बुलढाणा) : तालुक्यात वाळू तस्करी चांगलीच फोफावली असून, अवैधरित्या वाळूचे उत्खनन जोरात सुरू आहे. इसापूर व भोटा परिसरातील मोळा शिवारातिल नदीपात्रातिल तीरावर १४ एप्रिलच्या रात्री रेतीचा कडा कोसळून मजूर दबल्याची घटना घडली अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र प्रत्यक्षात यावर कोणी बोलायला तयार नाही . ज्ञानगंगा व पूर्णां नदी पात्रात रात्रीच्या वेळी अवैध रेती उत्खननदरम्यान दबलेल्या मजुराला वाचवताना चा व्हिडिओ नांदुरा तालुक्यात सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सदर परिसर हा नांदुरा व खामगाव तालुक्यातील भाग असून दोन्ही तालुक्याच्या तिरावर असल्याने रेती माफियांचे इथे चांगलेच फावले आहे . रात्रीचे वेळी अवैध रेती उत्खनन मजुरांच्या जीवावर उठत असल्याने महसूल विभागाने कारवाई करण्याची गरज आहे. . नांदुरा व खामगाव तालुक्यातिल ज्ञानगंगा व पूर्णा काठावर असलेल्या इसापूर व भोटा परिसरातील मोळा येथील हा व्हिडिओ असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र प्रत्यक्षात कुणीही बोलायला तयार नाही. रेती उत्खननादरम्यान कडा कोसळल्याने सदर युवक दबला होता. हा सर्व प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झाला; प्रत्यक्षात मात्र कोणीही यावर बोलायला तयार नाही.सर्व प्रकरण रेती माफियांनी रफा- दफा केले आहे. त्यामुळे कोणतीही तक्रार नाही.