डोणगाव : जालना जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला असल्याने तेथील वाळूची विदर्भात वाहतूक हाेत आहे.विशेष म्हणजे एकाच राॅयल्टीवर अनेक ट्रिप हाेत असून हजाराे रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
जालना जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे. तेथील रेती डाेणगावमार्गे वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात वाहतूक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे एकाच राॅयल्टीवर अनेक टिपर दिवसभर वाळूची वाहतूक करीत असल्याने शासनाचा हजाराे रुपयांचा महसूल बुडत आहे. वाळूची रॉयल्टी पाहिजे असेल तर ही वाळू एका ब्रास मागे ५०० रुपयाने महाग दिली जाते तर रॉयल्ट्रीची पावती पाहिजे नसेल तर त्यावर भाव करून कमी किमतीत वाळू टाकली जाते. एका दिवसात जास्त खेपा झाल्या पाहिजेत यासाठी ओव्हरलोड गाड्या निष्काळजीपणे भरधाव चालवल्या जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महसूल व पाेलिसांचे याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्यांची हिम्मत वाढल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.