लोणार : शहरातून नियमबाह्य रेती वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांना वाहनातून उडणाऱ्या रेतीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मराठवाड्यातील अवैध रेतीचा केंद्रबिंदू लोणार शहर आहे. या शहरामधून जवळपास १०० रेतीचे टिप्पर नियम धाब्यावर ठेवून खुलेआम रेतीची वाहतूक करीत आहेत. या वाहनांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
मराठवाड्यातील रेतीघाटावरून विनापरवाना, क्षमतेपेक्षा जास्त व एकाच पावतीवर अनेकवेळा रेती वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने चालवतात. रात्रीच्या वेळी मराठवाड्यातून येणाऱ्या रेतीच्या वाहनांची मंठा रोडवर रात्रीच्या वेळी महसूल विभागातील काही कर्मचारी तपासणी करतात. मात्र रेतीची अवैध वाहतूक होत असूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. लोणार तहसील अंतर्गत असलेले तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, भरारी पथक यांनी प्रामाणिकपणे कर्त्यव्य बजावले तर शासनाच्या महसूलमध्ये वाढ होईल. परंतु हे पथक कारवाईकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. यामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. भरधाव रेतीच्या वाहनावर कारवाई करणे गरजेचे आहे. गेल्या तीन-चार वर्षात रेती वाहनाच्या अपघातात अनेकांचा जीव गेलेला आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित प्रशासनाने वेळीच योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.
फोटो : लोणार शहरातून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक वाहतूक करणारा टिप्पर.