सिंदखेडराजा: तालूक्यात रेतीची अवैध वाहतूक सध्या तेजीत सुरू आहे. साखरखेर्डा परिसरातून पकडलेल्या विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर बुधवारी २ लाख ३२ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तहसिलदार संतोष कणसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.साखरखेर्डा परिसरात रेतीची अवैध विक्री करताना एक टिप्पर महसूल विभागाच्या नजरेस पडला. या टिप्पर मध्ये रॉयल्टी नसलेली चार बर्रास रेती आढळून आली. तो टिप्पर नायब तहसिलदार यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनला लावला असता तब्बल २० दिवसानंतर टिप्पर मालक रवी लाड यांच्याकडून दोन लाख ३२ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आजही साखरखेर्डा परीसरात मेरा मार्गे देऊळगावराजा तालूक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातील रेती मोठ्या प्रमाणात येत असून या रेतीची चोरी प्रकरणात मोठे रॅकेट सहभागी असल्याची चर्चा आहे. दोन बर्रासच्या नावाखाली फक्त एक बर्रास रेती टाकून सामान्य ग्राहकांकडून आठ ते १० हजार रूपयांपर्यंत पैसे वसूल केल्या जात आहे.(तालूका प्रतिनिधी)
रेतीच्या अवैध वाहतूक प्रकरणी वाहन मालकास दोन लाखावर दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:40 PM